सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या मार्ग मोकळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एक महापालिका, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन-चार वर्षानंतर निवडणुका होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
जिल्हा परिषद, महापालिकेवर गेल्या तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवकांकडून सातत्याने होत होती. मात्र, निवडणुुकीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका रखडल्या होत्या. परंतु मंगळवारी (दि. 6) सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घ्यायच्याच नाहीत का, असा सवाल उपस्थित करत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान पुढील महिन्यांपासून पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांना संधी मिळेल
निवडणुका घेतल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात झाल्या पाहिजेत, असे मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषद येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
येथे होणार निवडणुका
जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा, कुर्डूवाडी, दुधनी, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, मैंदर्गी, सांगोला, मोहोळ या नगर परिषदांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, माढा या 11 पंचायत समित्यांच्या निवडणुका मागील अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. त्यांच्या निवडणुकांचा मार्गही या निकालामुळे मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूकही नव्या निर्णयानुसार घेतली जाणार आहे.
0 Comments