मल्टीटास्किंग क्षमतेमुळे महिला उद्योजक बनण्यास सक्षम : प्रा. जेऊरकर
* श्री सिद्धेश्वर वूमेन्स इंजिनिअरिंगमध्ये जागतिक उद्योजक दिन साजरा
सोलापूर (कटुसत्य वृत्त): महिलांमध्ये असलेल्या मल्टिटास्किंग क्षमतेमुळे त्या उद्योजक बनण्यास अधिक सक्षम असतात. चंद्रयान-३ मोहिमेतील महिलांचे संशोधनातील योगदान उल्लेखनीय आहे. सातत्य आणि संयम या गुणधर्मामुळे महिला जलद गतीने प्रगती करू शकतात" असे प्रतिपादन साज कॅन्सल्टन्सीचे प्रा. शेखर जेऊरकर यांनी केले. श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जागतिक उद्योजक दिवसानिमित्त इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलद्वारे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. "उद्योजकता माणसासाठी नवीन नसून पूर्वापार बारा बलुतेदार प्रणालीद्वारे वस्तुविनिमय होत आले आहे. गावातील शेती व्यवसायापासून सुरु झालेल्या मानवाची प्रगती आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिकीकरणापर्यंत पोहोचली आहे. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी त्या विषयात तज्ज्ञ असणे आवश्यक नाही फक्त धाडस आणि व्यवस्थापन कौशल्य असणे आवश्यक आहे", असे त्यांनी सांगितले. त्यांनी महिलांसाठी उद्योग सुरु करताना लागणाऱ्या भांडवलासाठी उपलब्ध असलेल्या अन्नपूर्णा योजना, भारतीय महिला बँक बिझनेस लोन, मुद्रा योजना, ओरिएंट महिला विकास योजना, उद्योगिनी योजना यासारख्या अनेक योजनांची व तसेच त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.ए.चव्हाण यांनी कॉलेमधल्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून स्टार्टअप्स सुरु करता येते. नोकरीच्या पाठीमागे न लागता, स्वतः चा उद्योग सुरु करून दुसऱ्यांना नोकरी देणारे बना असे आवाहन केले. या प्रसंगी इंनोव्हेशन समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे, प्रा. संतोष मडकी, शिक्षक व अंतिम वर्षातील विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पूजा बिरादार यांनी केले तर आभारप्रदर्शन इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या समन्वयिका प्रा माधवी पाटील यांनी केले.
0 Comments