एचआयव्ही बाधित मुलांच्या पोषण आहारासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवावा
-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- एचआयव्ही बाधित मुलांच्या पोषण आहारासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करावी. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण युनिट पीसीपीएनडीटी समिती व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाधिकारी अमित महाडिक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण युनिट अंतर्गत जिल्ह्यात असलेल्या मुलांना उत्कृष्ट पोषण आहार उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला 10 लाखाचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. तरी आरोग्य विभागाने त्यासाठी सविस्तर प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठवावा. तसेच संपूर्ण जिल्ह्यात विशेषतः उत्तर सोलापूर, माळशिरस, पंढरपूर व बार्शी या तालुक्यात एड्स प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी. आयईसी वाहनाच्या दुरुस्तीसाठी निधी मागणी तसेच सबट्रॉन टॅबलेट मागणी प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे त्यांनी सूचित केले. जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण मागील तीन महिन्यात केलेल्या कामकाजाची माहिती कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांनी बैठकीत सादर केली. यामध्ये एचआयव्ही बाधितांना देण्यात येणाऱ्या सुविधा, या युनिट अंतर्गत कर्मचाऱ्यांची परिस्थिती, सन 2016 पासून एचआयव्ही बाधितांचे केलेली तपासणी व आलेला पॉझिटिव्हिटी रेट याविषयी माहिती त्यांनी दिली. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 84 हजार 500 टेस्टिंग करण्याचे उद्दिष्ट होते परंतु जिल्ह्यात 1 लाख 37 हजार 489 एच आय व्ही टेस्ट करण्यात आलेल्या असून त्यात पॉझिटिव्ह 72 आढळल्याची माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम:-
लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने तंबाखू नियंत्रणासाठी एक चांगला उपक्रम राबविण्यात आलेला आहे. त्या उपक्रमाविषयी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व तंबाखू नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. उपक्रम सोलापूर जिल्ह्यात राबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी अमित महाडिक यांनी एप्रिल 2017 ते मार्च 2023 व मार्च 2023 ते जुलै 2023 या कालावधीच्या अहवाल बैठकीत सादर केला. या कालावधी जिल्ह्यातील तंबाखू मुक्त आरोग्य संस्थेची संख्या 486, जिल्ह्यातील तंबाखूमुक्त शाळांची संख्या 706, निर्देशक फलक लावलेली ठिकाणी 606, जिल्ह्यातील तंबाखू मुक्त केंद्रांची संख्या 7, नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 318 त्यापैकी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडलेले यांची संख्या 1 हजार 40 इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकामार्फत सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोटपा कायदा 2003 अंतर्गत धाडी टाकून 550 लोकांवर दंडात्मक कारवाई केली असून 76 हजार 690 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे तसेच पोलीस प्रशासनामार्फत 14 हजार लोकांवर कारवाई करून 15 लाख 45 हजार 590 इतका दंड वसूल केलेला आहे, अशी माहिती महाडिक यांनी दिली.
पीसीपीएनडीटी जिल्हा दक्षता समिती:-
सोलापूर जिल्ह्याचे सन 2019 मध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर एक हजार पुरुषामागे 959 स्त्रिया असल्याचे दिसून येते तर सन 2022 मध्ये ते प्रमाण कमी होऊन 1000 पुरुषामागे 945 स्त्रिया इतके झालं आहे. जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण कमी असल्याने या प्रमाणात वाढ करण्यासाठी समितीच्या मार्फत आवश्यक असलेली सर्व प्रकारची कार्यवाही अत्यंत काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
बार्शी, वैराग, कुर्डूवाडी टेंभुर्णी, माळशिरस व अकलूज या भागात मुली जन्माचे प्रमाण कमी आहे. या भागात मुली जन्माचे प्रमाण कमी असण्याचे कारणे काय आहेत व त्यावरील उपाय योजना कशा पद्धतीने करता येतील याबाबत आरोग्य विभागाने माहिती घ्यावी व या भागातील मुली जन्माच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्त्री पुरुष गुणोत्तर सन 2019-20 मध्ये 983 इतके होते तर सन 2022 मध्ये ते प्रमाण 978 इतके झाले आहे. तसेच महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एकूण 217 सोनोग्राफी सेंटर ची नोंदणी झालेली असून त्यातील 23 सोनोग्राफी सेंटर कायमस्वरूपी बंद आहेत व एक सेंटर कोर्ट केसमुळे बंद असून सद्यस्थितीत चालू असलेले 194 सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लोहार यांनी दिली.
नागरिकांनी तक्रार करावी:-
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सोनोग्राफी सेंटरवर किंवा हॉस्पिटलमध्ये लिंग गुणोत्तर तपासणी होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी www.amchimulgi.gov.in वर किंवा हेल्पलाइन नंबर 1800 233 4475 यावर तक्रार करण्याचे आवाहन दक्षता समितीच्या मार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती देणाऱ्या संबंधित नागरिकास शासनाकडून एक लाखाचे बक्षीस देण्यात येत असून त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाते.
0 Comments