Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीच्या आधीच पंढरपूर मंगळवेढ्यात राजकीय हलग्या" नी " धरला जोर...!

 विधानसभा निवडणुकीच्या आधीच पंढरपूर मंगळवेढ्यात राजकीय हलग्या" नी " धरला जोर...!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राजकारणामध्ये आजचा मित्र उद्या शत्रू राहत नाही .आणि उद्याचा शत्रू आज मित्र राहत नाही.  याची  हुबेहूब प्रचिती येऊ लागलेली आहे. राजकारण हे ऊन सावल्यांच्या खेळाप्रमाणे सातत्याने बदलू लागलं असून राजकीय घमशान आणि समीकरणे सातत्याने बदलताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीला आणखी एक वर्ष वेळ असला तरी सुद्धा पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या संत नगरीमध्ये सध्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय हलग्या खणाणू लागल्या आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार समाधान आवताडे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील तसेच पोटनिवडणुकीत पराभवाची चव  चाखलेले माजी आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके विधानसभेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोठी फिल्डिंग लावताना दिसत असल्याचे चित्र आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ 2021 ला प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेला. पोटनिवडणुकीत भाजपाकडून समाधान आवताडे यांनी विजयाचा गुलाल उधळला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या आखाड्यामध्ये भाजपाकडून समाधान आवताडे यांचे तिकीट निश्चित  असल्यामुळे ते रणनीती आखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. उमेदवारी मध्ये जर बदल झाला तर या जागेवरून भाजपा माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सुद्धा या जागेवर तिकीट देऊ शकते. आणि या गोष्टीचा विचार करूनच प्रशांत परिचारक आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो या दोन्ही नेत्यांना मान्य करावा लागणार असल्याने हे दोन्ही नेते मोर्चे बांधणी करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024 च्या निवडणुकीत उतरून मंगळवेढा पंढरपूरचा आमदार व्हायचंच..! असाच धाडसी निर्णय घेऊन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील या आखाड्यात आत्तापासूनच रणनीती आखून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तयार असल्याचे त्यांच्या राजकीय हालचालीवरून दिसत आहे. वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टीचा त्रिवेणी संगम पाटलांच्या राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांचे मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात काम उभा राहत आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यामुळे आणि सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा विरोधकांना टक्कर दिल्यामुळे अभिजीत पाटलांचे नाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. स्वर्गीय भारत भालके यांनी सलग तीन निवडणुका जिंकून या मतदारसंघात हॅट्रिक केली होती परंतु पोट निवडणुकीत त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना पराभवाची चव चाखावी लागली. येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादीकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून भगीरथ भालके यांनी आषाढी यात्रेच्या शुभमुहूर्तावर बी आर एस मध्ये प्रवेश करून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन ही केले. आणि आपण सुद्धा पंढरपूर मंगळवेढ्याची विधानसभा लढू शकतो हे विरोधकांना दाखवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या नेत्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात रणनीती आखण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत हे मात्र नक्की..!

 
Reactions

Post a Comment

0 Comments