Hot Posts

6/recent/ticker-posts

पाथुर्डी येथील चार महिन्यांपूर्वी झालेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास नाही; सीसीटीव्ही असूनही चोरटे मोकाट

 पाथुर्डी येथील चार महिन्यांपूर्वी झालेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास नाही; सीसीटीव्ही असूनही चोरटे मोकाट



करमाळा (कटुसत्य वृत्त):-

करमाळा तालुक्यातील अनेक गावामध्ये शेळ्या, मेंढ्या, जनावरे चोरीचे प्रमाण वाढलेले असून याचा तपास लागत नसल्याने पशुपालक आता हैराण झालेला आहे. पशुधनाची चोरी झाल्याने शेतकऱ्यांना आता दिवसभर राबून रात्रभर शेळ्या मेंढ्यांना राखण बसण्याची पाळी आलेली आहे.
अनेक ठिकाणी बिबट्या असल्याचे अफवा असताना चोरीचे हे प्रकार घडत आहेत. झालेल्या चोरीचा तपास लागावा अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांमधून होत आहे.
अनेक पशुपालक शेळ्या मेंढ्याची चोरी झाली तरी तपास होत नसल्याने पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यास फिरकत नाहीत. त्यामुळे अशाच प्रकारामुळे चोराचे अधिकच फावते मात्र दिलेल्या फिर्यादीचाही तपास होत नसल्याने या चोरट्यांना मात्र अभय मिळत असल्याचे दिसत आहे.
पाथुर्डी गावात अशीच घटना घडली आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या शेळ्यांच्या चोरीचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. विशेष म्हणजे, चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असतानाही करमाळा पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे. या घटनेनंतर तातडीने करमाळा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा संपूर्ण प्रकार कैद झाला असून, त्यात चोरटे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे होईल, अशी अपेक्षा तक्रारदार शीतलकुमार मोटे यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे न घडल्याने तक्रारदाराने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता तर "चोरी होऊन चार महिने उलटले, गुन्हा दाखल आहे आणि सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसत असतानाही पोलीस चोरट्यांना का पकडत नाहीत?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून चोरट्यांना अटक करावी आणि चोरीस गेलेल्या शेळ्या परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी तक्रारदार शितलकुमार मोटे यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

चौकट
माझ्या शेळ्या दोन वेळा चोरी गेलेल्या होत्या. एक वेळा चोरी झालेल्या शेळ्यांच्या संदर्भात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिलेले आहेत त्या फुटेज मध्ये स्पष्टपणे चोरटे दिसत आहेत परंतु या चोरीचा तपास करण्यात करमाळा पोलीस असमर्थ ठरलेले आहेत या बाबत पोलिसांनी गंभीरपणे पावले उचलावीत व आम्हाला न्याय द्यावा.
– शितलकुमार मोटे , पीडित पशुपालक,पाथर्डी

Reactions

Post a Comment

0 Comments