विक्रोळीचा विकारहर्ता म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या परिपूर्ण उद्देशाचा गणपती -संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त

मुंबई (नासिकेत पानसरे):- विक्रोळी कन्नमवार नगरातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा विक्रोळीचा विकारहर्ता गणपती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या परिपूर्ण उद्देशाचा गणपती आहे यातूनच आदर्श तरुण पिढी घडविले जात आहे असा गौरव पूर्व प्रादेशिक विभाग चेंबूरचे अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी नुकताच केला.
सार्वजनिक गणेशोत्सव समिती 2022 च्या विद्यमाने स्मरणिकेचे प्रकाशन अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश दळवी, प्रमुख कार्यवाह अजय दळवी, कार्याध्यक्ष रुपेश गोठणकर, कोषाध्यक्ष विक्रांत सांगळे, विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण, एसीपी बनसोडे, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनोबत, जेष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे, आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत पण सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे गेली 34 वर्षे अविरतपणे फिजीओथेरेपी सेंटर
चालविणारे मुंबईतील हे एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे असे मंडळाचे प्रमुख सल्लागार व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाहक सुरेश सरनोबत यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. १९८७ साली सुरेश सरनोबत यांच्या संकल्पनेतून या फिजिओथेरपी सेंटरची कल्पना पुढे आली त्यावेळी अशोक सावंत दुलाजी लाड, विक्रांत आंगणे, सत्यवान खोत, आदी. गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी ही कल्पना उचलून धरली.
प्रथम सुरेश सरनोबत यांनी २५ हजाराची देणगी दिली आणि फिजिओथेरपी सेंटर सुरू झाले या सेंटरचा मुंबई तसेच मुंबई उपनगरातील अनेक रुग्ण लाभ घेत आहेत या गणेशोत्सवाच्या माध्यमातून माजी महापौर व नुकतेच शिवसेना उपनेते म्हणून घोषित झालेले दत्ता दळवी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत माजी नगरसेविका सुचिता चिंदरकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, माजी महिला शाखा संघटिका अहिल्या थोरवे,वंदना बेंद्रे आदी. कार्यकर्ते तयार झाले आहेत.
मंडळातर्फे डोळ्यांचे शिबिर, शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, पाककला स्पर्धा, विद्यार्थ्यांचा गुण गौरव आदी. कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष योगेश दळवी यांनी सांगितले
No comments:
Post a Comment