सांगोला नगरपरिषदे मार्फत भव्य "तिरंगा रॅली" संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 8, 2022

सांगोला नगरपरिषदे मार्फत भव्य "तिरंगा रॅली" संपन्न

सांगोला नगरपरिषदे मार्फत भव्य "तिरंगा रॅली" संपन्न

फॅबटेक समूहाच्या ७५० विद्यार्थ्यांचा सहभाग !

              सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदे मार्फत मागील काही दिवसांपासून शहरात "हर घर तिरंगा" अभियानाचा अत्यंत प्रभावीपणे प्रचार, प्रसार सुरू असून याचाच एक भाग म्हणून नगरपरिषदे मार्फत फॅबटेक स्कूल, कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली भव्य "तिरंगा रॅली" अतिशय उत्साहात पार पडली असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

              नगरपरिषद कार्यालय पासून सुरुवात झालेली रॅली शिवाजी चौक, भोपळे रोड, फुले चौक या मार्गाने जावून तिची नगरपरिषद कार्यालयात सांगता झाली. फॅबटेक स्कूल, ज्युनिअर कॉलेज, फार्मसी, इंजिनियरिंग अश्या विविध गटातील एकूण 750 विद्यार्थ्यांनी या रॅली मधे नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यां समवेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शिवाजी चौका, फुले चौक येथे स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या महात्म्याच्या संदेश देणार पथनाट्य तसेच हर घर तिरंगा हे गीत सादर केले. विद्यार्थ्यांच्या हातातील संदेश देणारे सूचना फलक, तिरंगी झेंडे, लांबलचक शिस्तीने चलानारी रांग लक्षवेधक होती तसेच लहान मुलांच्या व नगरपरिषद कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

              सांगोला नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या रॅली मधे सहभागी झाला होता.  नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी श्री. हनमा लोखंडे यांनी साकारलेली महात्मा गांधी यांची वेशभुषा ही या तिरंगा रॅली चे प्रमुख आकर्षण ठरली. रॅली दरम्यान वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी प्रयत्न करणे, सर्व विद्यार्थ्यांना पाणी, केळी उपलब्ध करून देणे, शिस्त पाळली जाणे यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सांगोला शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपल्या घरावर, दुकानावर ध्वज फडकवावा हा संदेश या तिरंगा रॅली मधून नागरिकांना देण्यात आला.

              या तिरंगा रॅलीस सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे, सर्व अधिकारी, कर्मचारी, फॅबटेक समूहाचे सिकंदर पाटील सर, संजय अडाते सर, संजय बैस सर, पवार सर, नार्वे सर, बाबर मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. या रॅलीच्या आयोजनासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर, विजयकुमार कन्हेरे, योगेश गंगाधरे, अमित कोरे,नयन लोखंडे, शरद चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

              सांगोला शहरातील नागरिकांना "हर घर तिरंगा" अभियानाची अधिक माहिती व्हावी आणि प्रत्येकाने दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर,दुकानावर तिरंगा ध्वज फडकवावा या हेतूने या भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. फॅबटेक शाळा, कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा उत्साह प्रेरणादायी होता आणि यातून प्रेरणा घेवुन सांगोला शहर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'तिरंगी' होईल असा विश्वास वाटतो. - कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages