अत्रे यांनी विनोद हा मुख्य विषय केला : बंडा जोशी
.png)
आचार्य अत्रे जयंतीनिमित्त हास्य- विनोदाची मेजवानी मसाप, शाखा सोलापूरच्या वतीने कार्यक्रम
सोलापूर (कटुसत्य वृत्त): १३ विनोद हा माणसाच्या प्रकृतीसाठी आवश्यक असून विनोदामुळे हास्य फुलते व प्रकृती उत्तम राहाते. खळखळून हसणे हे निरोगी मनाचे व आरोग्याचे लक्षण आहे,असे प्रतिपादन बंडा जोशी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा- सोलापूर व कै. वा.गो. काटकर यांच्या कुटुंबीयांच्या सहयोगाने आचार्य अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘आचार्य अत्रे, विनोदकारांची प्रेरणा’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, पूर्वी साहित्यात व भाषणात विनोद नाममात्र होता, परंतु आचार्य अत्रे यांनी या दोन्ही क्षेत्रात विनोद हा मुख्य विषय केला. आचार्य अत्रे हे विनोदकारांची प्रेरणा असून त्यांनी विडंबन काव्याला चालना दिली. ‘अष्टपैलू’ हा शब्दही अपुरा पडेल असे आचार्य अत्रे यांनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी कार्य केले. प्रत्येकाच्या आयुष्यात लहान लहान प्रसंगात विनोद घडत असतात. त्याकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे. आचार्य अत्रे यांचे काही किस्से सांगून त्यांनी ‘याड लागलं रं...’, ‘काय झाडी, काय डोंगार...’ या विनोदी कविता सादर करून रसिकांना खळखळून हसवले.
सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक अॅड. जे.जे. कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. वंदना कुलकर्णी यांनी करून दिला. या वेळी बंडा जोशी यांचा हॉटेल सूर्या इंटरनॅशनल च्या वतीने व मसाप शाखेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना परिषदेमार्फत डॉ. नरेंद्र काटीकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज भेट देण्यात आला. प्रा डॉ श्रुती श्री. वडगबाळकर यांनी आचार्य अत्रे यांना अभिवादन केले. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या कार्यकतृत्वाचा व साहित्य लेखनाचा आढावा घेतला.
यावेळी मंचावर दत्ताअण्णा सुरवसे, मारुती कटकधोंड व डॉ. नरेंद्र काटीकर उपस्थित होते. आभार डॉ. देवीदास गुरव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले. या कार्यक्रमास प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर, पुष्पा आगरकर मॅडम , प्राचार्य डॉ जमादार सर , डॉ. नसीम पठाण, पद्माकर कुलकर्णी, गिरीश दुनाखे, अरविंद जोशी, गोविंद काळे, डॉ. सुवर्णा गुंड, अरुण नवले यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते.
आचार्य अत्रे जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते श्री. बंडा जोशी यांचा सत्कार करताना डावीकडून मारुती कटकधोंड, दत्ताअण्णा सुरवसे, डॉ. श्रुती श्री वडगबाळकर, डॉ.नरेंद्र काटीकर
No comments:
Post a Comment