अतिवृष्टीग्रस्तांना तुटपुंजी मदत ! शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही. : नाना पटोले

मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत तर तुटपुंजी आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत त्यामुळे दुप्पट नाही तर त्यापेक्षा जास्त मदत देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी व थट्टा करणारी आहे.अतिवृष्टग्रस्तांना भरीव मदत द्या अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही,असा इशारा कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित आझादी गौरव पदयात्रेदरम्यान नाना पटोले औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती पण ती मदत अपुरी आहे म्हणून आत्ता सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती मग आता जाहीर केलेली मदत दिलासा देणारी कशी? काँग्रेस पक्षाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती सरकारने मात्र फक्त १३ हजार रुपये जाहीर केले आहेत ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मदत देताना ३ हेक्टरची मर्यादा घातली आहे ती सुद्धा अन्यायकारक असून ही मर्यादा काढून टाकावी.असे पटोले म्हणाले.
शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती...
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्ष नेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा केली नाही. यावर एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे असे नाना पटोले म्हणाले.
No comments:
Post a Comment