वाखरी ते श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर रस्ता चौपदरीकरणासाठी 150 कोटींचा निधी मंजूर - प्रशांत परिचारक


देशात प्रथमच राष्ट्रीय महामार्ग करणार शहरात रस्ता
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- वाखरी ते पंढरपूर शहरातील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर हा 8.00 कि.मी रस्ता राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सिमेंट कॉक्रीट करणेसाठी 150 कोटी मंजूर झाले असून याअंतर्गत रेल्वे पुलावर उड्डानपूल होणार असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
तिर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये येणाऱ्या वर्षाकाठी 1 कोटीहून भाविकांची संख्या लक्षात घेवून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी खास बाब म्हणून देशात प्रथमच शहर हद्दीमध्ये रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल आ.परिचारक यांनी मा.गडकरी साहेब यांचे तमाम वारकरी व पंढरपूरातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले.
यावेळी आ.परिचारक यांनी, पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटकरण झालेले आहेत. गडकरी साहेब यांचा महत्वकांशी प्रकल्प असलेला पालखी मार्ग देखील पुर्ण होत आहे. सदर रस्ता वाखरी पर्यतच करण्याचे नियोजन होते. मात्र भाविकांच्या सोयीसाठी वाखरी पासून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरापर्यत 4 लेन सिमेंट काँक्रीटकरण्या विषयी आपण मागणी केली होती. 2016 पासून यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते व नितीन गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पालखी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी गडकरी साहेब यांनी हा रस्ता करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातून वाखरी ते श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर रस्ता करण्यास मान्यता मिळाली आहे.
वाखरी ते पंढरपूर हा चार पदरी रस्ता असून यावर पंढरपूर बाजार समिती ते भोसले चौक येथे उड्डानपुल होणार आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे सरमग चौक, इंदिरा गांधी चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होते. तसेच रेल्वे पुला खाली पाणी साचून राहिल्याने वाहतूकीस अडथळा होतो या उड्डान पुलामुळे हा प्रश्न मार्गी निघणार आहे.
वाखरी ते एम.आय.टी कॉलेज रस्ता 830 मीटर, एम.आय.टी.कॉलेज ते अर्बन बँक सुमारे 7 कि.मी, अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अंदाजे मंजूरी 470 मीटर असा एकुण 8.4 कि.मी रस्ता आहे. सदर रस्त्यासाठी कोणाचीही जमिन अधिगृहण केली जाणार नाही. शासन जागेतच संपुर्ण रस्ता व पूल होणार आहे. येत्या 2 महिन्यात काम सुरू होवून 24 महिन्यात संपुर्ण रस्ता करण्याचे नियोजन आहे.
वाखरी येथे पुराचे पाणी साठत असल्याने छोटा पूल होणार असून वाखरी ते के.बी.पी. चौक पर्यत सर्व्हिस रोड असणार आहे. दुध डेअरी व मलपे चौक याठिकाणी नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी अंडरपास (बोगदा) होणार आहे.
तसेच माढ्याचे खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूरचे खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, पंढरपूर मंगळवेढ्याचे आ.समाधान आवताडे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक केशव घोडके व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य आहे.
दरम्यान नारायण चिंचोली येथील ग्रामस्थांनी अंडरपास (बोगदा) करण्याची मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे केली होती. ती देखील गडकरी साहेब यांनी पुर्ण करून यासाठी 95.31 लाखांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
No comments:
Post a Comment