Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे लाडू प्रसाद केंद्र सुरु

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे लाडू प्रसाद केंद्र सुरु



भाविकांना मिळणार अल्पदारात प्रसाद - सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

                 पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या वतीने लाडू प्रसाद विक्री पुन्हा 01 जुलै 2022 पासून सुरु केले असल्याची माहिती मंदीर समितीचे सह. अध्यक्ष  ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

                 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानूसार ‘श्री’ चा  लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने  शासनाने लागू केलेले निर्बंध शिथील केल्यानंतर मंदिर समितीने लाडूप्रसाद खरेदी कामाची विहित प्रक्रिया पूर्ण करुन. दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्था मर्या. नाशिक यांना लाडू प्रसादाचा ठेका देण्यात आला . लाडू प्रसाद केंद्रावर  बुंदी व राजगिरा असे दोन प्रकारचे लाडू भाविकांना विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून, रिफाईड शेंगदाणा तेलातील बुंदी लाडूप्रसाद (एक लाडू प्रति 70 ग्रॅंम याप्रमाणे दोन लाडूचे पॅकेट) 20 रुपये तर राजगिरा लाडूप्रसाद (एक लाडू प्रति 25 ग्रॅंम याप्रमाणे दोन लाडूचे पॅकेट) रू.10.00 प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आले  असल्याचे ह.भ.प. औसेकर महाराज यांनी सांगितले.

                 श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना दोन वर्षांनंतर लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. आषाढी यात्रा कालावधीत 3 ते 4 लाख पाकीट बुंदी लाडू तर 1 लाख पाकीट राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करण्याचे नियोजन केले असून, लाडूप्रसाद हा भाविकांच्या श्रध्देचा व भावनेचा भाग आहे.लाडूप्रसाद सुरू झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत असल्याचेही ह.भ.प. औसेकर महाराज यांनी सांगितले.

                 लाडू प्रसाद केंद्राचे उद्घाटन समितीचे सह. अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्‍यात आले. या प्रसंगी मंदीर समितीचे सदस्य ह. भ. प प्रकाश जवंजाल, ह भ प शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे,  मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख राजेश पिटले तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments