नेतृत्वावर गंभीर आरोप करीत रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 18, 2022

नेतृत्वावर गंभीर आरोप करीत रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

नेतृत्वावर गंभीर आरोप करीत रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

              मुंबई (नासिकेत पानसरे): तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम कधीच झालेच नाही. उलट मला आणि माझ्या मुलाला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले, असा गंभीर आरोप करीत माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात कदम यांनी अनेक मुद्दे उपस्थित करीत तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देताच काहीच तासात शिंदे गटाने त्यांची नेतेपदी नियुक्ती केली. त्यामुळे शिवसेना गटात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 

              गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. याआदी अनिल परब यांच्या पालकमंत्री पदावरून त्यांनी आपली नाराजीही माध्यमांसमोर व्यक्त केली होती. अखेर सोमवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून स्वतःच्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच शिवसेना नेते पदाला जय महाराष्ट्र करीत शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नेतृत्वावरील नाराजी ही व्यक्त करीत गंभीर आरोप केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळाले. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले असा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोलले तरी आपण माध्यमांसमोर अजिबात जायचे नाही. कुठलेही वक्तव्य करायचे नाही,यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही असा सवालही कदम यांनी या पत्रात केला आहे.

              मागील तीन वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. २०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मीआपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका,ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावरही वेळ आली नसती अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत मी  "शिवसेना नेता " या पदाचा राजीनामा देत आहे असे कदम यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी शिंदे गटाने आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कदम यांची नेतेपदी निवड करून शिवसेनेला धक्का दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages