सत्ता गेल्याने राष्ट्रवादीसह शिवसेना सैरभैर - चेतनसिंह केदार सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

सत्ता गेल्याने राष्ट्रवादीसह शिवसेना सैरभैर - चेतनसिंह केदार सावंत

सत्ता गेल्याने राष्ट्रवादीसह शिवसेना सैरभैर - चेतनसिंह केदार सावंत

राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी शिवसेना- भाजपचे सरकार कटिबद्ध

               सांगोला (कटूसत्य वृत्त):-  राज्यात अडीच वर्षांनंतर सत्तांतर झाले. विधान परिषद निवडणूक निकालानंतर अनाकलनीय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडल्याने ५५ आमदारांपैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगळी राजकीय चूल मांडत हिंदुत्ववादी भाजपशी सोबत करत सत्ता संपादन केली. या राजकीय घडामोडीत सत्ता गेल्याने राष्ट्रवादीसह शिवसेना सैरभैर झाली आहे. जनतेच्या मनातील शिवसेना भाजपचे सरकार सत्तेत आल्याने राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी शिवसेना-भाजपचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत  यांनी दिली.

               सत्तातरांच्या या घडामोडींवर बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत म्हणाले, मुळातच शिवसेनेच्या अनेक आमदारांना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून महाविकास आघाडीच्या नावाखाली सत्तेत सहभागी होणे पसंत पडले नव्हते. कडवट हिंदुत्ववादी पक्ष ही शिवसेनेची प्रतिमा असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होणे अनेक आमदारांच्या पचनीही पडले नव्हते. हिंदुत्ववादी पक्ष असणाऱ्या भाजपसोबत लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणे व सत्तासंपादन करताना हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची सोबत सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्तेसाठी सोबत करणे हीच मुळी शिवसेना आमदारांसाठी संतापजनक बाब होती. अडीच वर्षे या शिवसेना आमदारांची घुसमट वाढत होती. 

               शिवसेनेची मुख्यमंत्रीपदावर बोळवण करून खरे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच चालवत होती. राज्याचा अधिकाधिक निधी सत्तेतील शिवसेना व काँग्रेस या मित्रपक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच पळवत होती. मतदारसंघातील विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी मिळतच होता. परंतु ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पडले, त्या उमेदवारांनाही निधी देताना मतदारसंघातील त्यांचे प्राबल्य वाढविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षांत नियोजनबद्धरित्या केले. हे सर्व शिवसेना आमदारांच्याच मतदारसंघात अधिकाधिक प्रमाणावर सुरू होते. असे एक प्रकारे शिवसेना आमदारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत होता. मातोश्रीवर व वर्षावर शिवसेना आमदारांची कैफीयत जाणून घेण्यास उद्धव ठाकरे यांना वेळ नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार जिवंत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ५५ पैकी तब्बल ४० हून अधिक आमदारांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांचा असंतोष, घुसमट, सत्ता असूनही नेतृत्वाकडून होणारी उपेक्षा याचा एकत्रित मिलाफ होऊन हा उद्रेक घडला. या उद्रेकानंतर सत्ता गमविल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना सैरभैर झाली आहे. शिवसेना आमदारांनाही सहजासहजी वर्षावर, मातोश्रीवर तसेच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उपलब्ध न होणारे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख शिवसैनिकांना आता सहजासहजी उपलब्ध होऊ लागले आहेत. सत्ता गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. सत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना खऱ्या अर्थाने सैरभैर झाली असून संतुलन ढासळल्याने त्यांची वाटचाल बिकट झाली असल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages