सुरक्षित, आनंददायी वारी होण्यासाठी प्रयत्न करा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
.jpg)
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- यंदा कोरोनाचे निर्बंध उठल्याने आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक/वारकरी येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांना कोणत्याही समस्या येऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. ही वारी योग्य नियोजनाने सुरक्षित, आनंददायी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करण्याच्या सूचना विधापरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.
आषाढी वारी तयारी आढावा बैठकीत डॉ. गोऱ्हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होत्या. सोलापुरातून बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवरील वज्रलेपाची झीज होणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाचा आराखडा, भक्त निवास आणि पंढरपूर शहराची स्वच्छता व नगरपालिकाबाबतचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. यंदा आषाढी वारीतही 15 ते 16 लाख भाविक येण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. वारकऱ्यांना पालखी मार्ग, पंढरपुरात पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, भक्त निवासाबाबत जनतेला त्वरित मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन केल्याचे गौरवोद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.
रस्त्यांची 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, उड्डान पुलाची कामेही वेगाने सुरू आहेत. वारीत स्वच्छता, पाणी, आरोग्य यावर भर द्यावा, मैला स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. घनकचरा व्यवस्थापनाबाबत दक्षता घ्यावी. भाविकांचा ओढा एस.टी. बसस्थानक येथील स्वच्छतागृहांकडे असतो, तेथील स्वच्छता, मनुष्यबळ, सुरक्षा याकडेही लक्ष द्यावे, चंद्रभागा नदीमध्ये काही ठिकाणी खड्डे आहेत, याठिकाणी धोक्याच्या सूचनांचे फलक लावावेत. शिवाय खड्ड्यांच्या ठिकाणी फ्लॅग त्वरित लावण्याची व्यवस्था करावी. तात्पुरत्या बसस्थानकावरील तात्पुरत्या शौचालयाठिकाणी स्वच्छता, पाणी याचीही दक्षता घ्यावी. हरविलेल्या व्यक्ती, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
वारीला येणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या जास्त असल्याने त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या. वारीदरम्यान येथील स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन केंद्रावरील कचरा उचलणे, निर्माल्य वेळोवेळी उचलले जाईल, याची सुध्दा काळजी घेण्यात यावी.
भाविकांशी संयम, सौजन्याने वागावे
दोन वर्षांनंतर वारी होत असल्याने यावर्षी वारीसाठी येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन करणे आवश्यक आहे. याशिवाय या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांशी नियुक्त सेवकांनी सौजन्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असून याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोविडचे संकट अजूनही संपले नसून मंदिरात भाविकांची खूप गर्दी होणार नाही आणि महिला भाविकांशी कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी आवश्यक ते सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
रुक्मिणी मंदिरात एक्झॉस्ट पंखे तातडीने बसवा
रुक्मिणी मुर्तीवरील वज्रलेप लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आता 9 आणि 10 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार असल्याने तातडीने रुक्मिणी मंदिरात एक्झॉस्ट पंखे तातडीने लावण्यात यावे. वारीसाठी मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी होत असल्याने मूर्तीची काळजीही घेण्यात यावी. तसेच मंदिर परिसरातील किरकोळ कामेही तातडीने करुन घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.
भक्त निवासाचे काम तातडीने पूर्ण करा
पंढरपूर येथील भक्त निवासाचे तळमजला आणि बेसमेंटचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करावे. अंदाजपत्रकाबरोबर या संदर्भातील अहवाल विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही तातडीने करावी, जेणेकरुन हे काम लवकर पूर्ण होईल, अशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
यावेळी शंभरकर यांनी आषाढी वारी तयारी आणि नियोजनाबाबतची माहिती दिली. नदीकाठी असणाऱ्या घाटाला पायऱ्या केल्या असून दगडी पूल, प्रदक्षिणा मार्ग येथील खड्डे बुजविले आहेत. याठिकाणी बॅरेगेटस लावून भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. पालखी मार्ग, पंढरपुरात पाण्याचे टँकर, गॅसची सुविधा देण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यशदाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालखी मार्गात 70 मोटरसायकलवरील आरोग्यदूतांची नियुक्ती केली असून ते जिथे रूग्ण असेल तिथे जावून औषधोपचार करणार आहेत. वारी कालावधीमध्ये संपर्कासाठी वॉकीटॉकीची व्यवस्था, पंढरीची वारी हे ॲप तयार केले असून यातून वारकऱ्यांना सुविधांची माहिती देण्यात आली आहे. वारीसाठी 140 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून 26 सीसीटीव्ही हे मंदिर परिसरात बसविण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन, हिरकणी कक्षाची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.
हरित वारीमध्ये पालखी मार्गावर 10 हजारांचे वृक्षारोपण
स्वामी यांनी सांगितले की, वारी कालावधीत महिला वारकऱ्यांच्या मदतीसाठी महिला मार्गदर्शक नेमले आहेत. माता-बाल कक्ष स्थापन केला असून अनुभवी स्त्री-रोग तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. हरित वारीच्या माध्यमातून पालखी मार्गावर ठिकठिकाणी 10 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी झाडे ज्यांच्या शेताच्या बाजूला लावली आहेत, त्यांची राहणार आहे. यातून पालखी मार्ग हरित करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्लॅस्टिक बॉटल, सॅनिटरी नॅपकीन यांच्या विल्हेवाटीसाठी व्यवस्था निर्माण केली आहे. शिवाय जसजशी दिंडी गावातून पुढे जाईल, तसतशी स्वच्छता करण्याचे नियोजन आहे.
श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, 10 माऊली स्क्वॉडद्वारे वारकऱ्यांना रांगेतून पुढे सरकण्यासाठी प्रेमाने विनवणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर कोणतीही घटना घडली तर त्वरित संपर्क होण्यासाठी 100 गॅमा कमांडो दुचाकीसह नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. 9, 10 आणि 11 जुलै 2022 च्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 200 जणांना यशदाचे प्रशिक्षण देण्यात आले असून गर्दीत वृद्ध व्यक्ती पडल्यास त्याला कसे उचलावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालखी मार्गावर तीन ठिकाणी वॉच टॉवर टेहळणीसाठी राहणार आहेत.
No comments:
Post a Comment