'विठ्ठल'च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; अभिजित पाटलांनी मारली बाजी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 7, 2022

'विठ्ठल'च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; अभिजित पाटलांनी मारली बाजी

 'विठ्ठल'च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; अभिजित पाटलांनी मारली बाजी 

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24 तासापासून मतमोजणी सुरु असलेली मतमोजणी संपली असून नवख्या अभिजित पाटील यांनी सत्ताधारी भगिरथ भालके यांचा पराभव करीत 18 वर्षानंतर सत्तांतर घडवले.

अभिजित पाटील यांनी या विजयासह पाचवा कारखाना घेतला आहे. या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा हादरा मानला जात आहे. राष्ट्रवादीचे भगिरथ भालके, कल्याण काळे आणि भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या सारख्या दिग्गजांच्या पॅनल पराभूत करीत अभिजित पाटील पुढे आले आहेत. विशेष म्हणजे सर्व नवख्या उमेदवारांना घेऊन पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती.

पंढरपूरचे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून या कारखान्याच्या सत्तेकडे पहिले जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या नंबरवर फेकले गेल्याने भालके यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.

यानिवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच युवराज पाटील यांनीही आपले पॅनल उभे केले होते. अतिशय तरुण नेता म्हणून अभिजित पाटील याना पसंती देताना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या इतर चार साखर कारखान्यामुळे विठ्ठलाच्या मतदारांनी अभिजित पाटील यांचेवर विश्वास दाखवला आहे. पाटील यांनी 20 वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन केवळ 35 दिवसात तो सुरु केला होता. यामुळेच गेल्या 2 वर्षांपासून बंद पडलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी अभिजित पाटील यांना पसंती दिल्याचे दिसत आहे.

या पराभवाचा फटका राष्ट्रवादी आणि भगिरथ भालके यांना बसणार असला तरी मतमोजणी प्रक्रियेवर दुसरे पॅनल प्रमुख युवराज पाटील यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. उद्यापासून कामगारांना घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असून 1 ऑक्टोबरपासून कारखाना सुरू करणार आणि सभासदांना 2500 रुपये भाव देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पंढरपूरचे वैभव म्हणून ओळख असणाऱ्या आणि सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेत्यात चढाओढ सुरु होती. विठ्ठल कारखान्यावर सध्या भगिरथ भालके गटाची सत्ता होती. मात्र एका गाळपाचे बिल देऊ न शकल्याने तसेच कामगार आणि ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्याने सत्ताधारी भालके गट बॅकफूटवर होता. अशात आर्थिक अडचणींमुळे आणि कोट्यवधींचे कर्जे झाल्याने हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. यामुळे सध्या लागलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत हा कारखाना जिंकण्यासाठी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कंबर कसली होती. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात 4 कारखाने आहेत. या विजयासह पाटील यांनी पाचवा कारखाना आपल्या हाती घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages