विस्कळित पाणीपुरवठाच डेंग्यूला कारणीभूत

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील नागरिकांनी पाहिलेले नियमित पाणीपुरवठ्याचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही. दोन दिवसांआड सुद्धा पाणी मिळत नाही. स्मार्ट सिटीतील नागरिकांना पाच-सहा दिवसांआड पाणी मिळत असल्याने ते पाण्याचा मोठा साठा करून ठेवतात. त्यातूनच डेंग्यू, मलेरियांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याची स्थिती आहे.शास्त्री नगरात डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही, पण त्या परिसरात डेंग्यूचे डास आढळले. आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी त्या ठिकाणी पाहणी करून नागरिकांची रक्त तपासणी केली. बहुतेक नागरिक घरासमोर साठवून ठेवलेले पाणी झाकून ठेवत नाहीत. स्वच्छ पाण्यावर डेंग्यूची उत्पत्ती होते. त्यामुळे झाडांच्या कुंड्या तसेच घरासमोरील बगीचातील खड्ड्यात पाणी साठणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. तसेच संशयितांनी वेळेवर उपचार आणि काळजी घेतल्यास डेंग्यूचा धोका टळतो. ताप नियंत्रणात ठेवणे आणि शरीरात भरपूर द्रवपदार्थ घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी, रुग्णाच्या प्लेटलेटच्या संख्येची तपासणी करणे, यामुळे डेंग्यूचा प्रसार रोखता येतो. पण, एकमेव मार्ग म्हणजे पूर्वकाळजी घेणे म्हणजेच प्रतिबंध घालणे, असेही डॉ. लोहारे यांनी स्पष्ट केले.
0 Comments