हुतात्मा, सिद्धेश्वरसह ११० गाड्यांसाठी मिळणार जनरल तिकिटे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आरक्षण नसलेल्या व अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रवाशांना जनरल तिकिटावरही प्रवास करता येणार आहे. २९ जूनपासून सोलापूर विभागातून धावणाऱ्या तब्बल ११० रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट विक्रीस प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.मार्च २०२० मध्ये कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट बंद केले होते. केवळ आरक्षित तिकिटावर प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांच्या खिशावर आर्थिक भार देखील पडला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वेची सेवादेखील बंद केली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताच रेल्वे प्रशासनाने आरक्षित तिकिटावर रेल्वेची सेवा पुन्हा सुरू केली. सद्य:स्थितीत केवळ पॅसेंजर आणि मोजक्याच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळत असून, येत्या २९ जूनपासून पॅसेंजरसह मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये देखील जनरल तिकिटावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
0 Comments