शरद बँकेच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आता अध्यक्ष निवडीकडे लक्ष


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील शरद नागरी सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक मागील प्रथेप्रमाणे बिनविरोध पार पडली असून आता अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे. बँकेच्या एकूण १३ जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतू आलेल्या २१ अर्जापैकी आठ माघार घेतल्याने सर्वच्या सर्व १३ जागा बिनविरोध घोषित करण्यात आल्या. यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून प्रा. महेश माने, मुकूंद जाधव, ज्ञानेश्वर सपाटे, सोलापूर विद्यापीठ प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार,
निलेश उंब्रजकर, धनंजय चव्हाण, सारंग सपाटे, प्रभावती जाधव, महिला प्रतिनिधी महानंदा सोलापुरे, अनिता माने, भटक्या विमुक्त जाती-जमातीतून शंकर चव्हाण,अनुसूचित जाती-जमातीमधून प्रा.अनिल लोंढे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून युन्नुस मुजावर या नुतन संचालकांची निवड करण्याचा अधिकार बँकेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सपाटे यांना देण्यात आला होता त्यांनी वरील सर्वांची निवड बिनविरोध करून बँकेची परंपरा कायम राखली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. वैशाली साळवे यांनी काम पाहिले. त्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अवताडे यांचे सहकार्य लाभले. बँकेच्या स्थापनेपासून अध्यक्ष राहिलेले मनोहर सपाटे हे आता
विद्यमानसंचालक मंडळात नसल्याने बँकेचा अध्यक्ष सपाटे परिवारातील होणार की सपाटे आपल्या सहकार्यांना संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सपाटे परिवारातील तीन सदस्य बाहेर
बँकेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सपाटे हे स्वत: बँकेच्या निवडणूकीत उतरले नाहीत तसेच मागील संचालक भावजय रेखा सपाटे व कन्या प्रा. मंजुळा सपाटे यांनाही सपाटे यांनी बँकेच्या संचालक मंडळातून बाजूला केले आहे. त्यामुळे केवळ बँकेत आता पुतण्या ज्ञानेश्वर सपाटे यांना संचालक केल्याने त्यांचा वारसदार म्हणून बँकेच्या आगामी अध्यक्षपदी ज्ञानेश्वर यांची निवड मनोहर सपाटे करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0 Comments