मुख्याध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरणचे दोन अधिकारी निलंबित

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील विद्युत अपघाताला जबाबदार धरत बार्शी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता महेश झिंगाडे आणि तंत्रज्ञ संभाजी दळवी या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
शेतकऱ्याने तक्रार करूनही वेळेत निवारण न केल्यामुळे कासारवाडी येथे शेतात तुटलेल्या तारेतील विजेच्या धक्क्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता महेश भगवान झिंगाडे, तंत्रज्ञ संभाजी शिवाजी दळवी यांना बार्शीचे विभागीय कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
बार्शी येथील जनसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश गुंड आणि त्यांचे बंधू अड. प्रकाश गुंड हे गुरुवारी सकाळी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना शेतात तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श होऊन विजेचा धक्का बसला. यात मख्याध्यापक सतीश गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर ॲड. प्रकाश गुंड जखमी झाले.
महावितरणच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
बार्शी तालुक्यातील कासारवाडी गावातील ऊस शेती मध्ये तुटून पडलेल्या विजेच्या तारांमधील विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जनसेवा हायस्कूलचे मुख्याध्यापक सतिश शिवाजीराव गुंड ( वय 57) हे जागीच मयत झाले. तर त्यांचे ज्येष्ठ बंधू शेतकरी प्रकाश गुंड हे गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी 9 वाजता घडली.
घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले असून त्यावरील तारा तुटून जमिनीवर पडल्या आहेत. कासारवाडी येथील आपल्या शेतामध्ये सकाळी गुंड बंधू विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले होते. तेंव्हा प्रथम प्रकाश गुंड तुटून पडलेल्या तारेमधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यामुळे ते कोसळून खाली पडले.
त्यांच्या अंगावर पडलेली तार आपल्या शर्टाने उचलून बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांचे बंधू सतीश गुंड यांना त्या तारेचा गळ्याजवळ व छातीजवळ मोठा धक्का बसला. शेतातील कामगारांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
दरम्यान वादळवारे येवून दोन दिवस उलटूनही तालुक्यात अनेक ठिकाणी पडलेले वीजेचे खांब व तारा यांचा आढावा घेवून ठिकठिकाणी तुटलेल्या तारांमधील विद्युत प्रवाह खंडीत करणे, याबाबत महावितरणच्या अधिकार्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. याबाबत शेतकर्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुर्हाडे व कनिष्ठ अभियंता महेश झिंगाडे यांच्याकडे तक्रारी करुनही प्रशासन ढिम्म राहिले.
त्यामुळे गुंड यांचा महावितरण अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळेच हकनाक बळी गेला आहे. या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी उर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी केली होती.
गुंड हे मिरगणे यांचे सख्खे मेहुणे आहेत. गुंड घराणे बार्शी तालुक्यातील नामांकित शिक्षणसंस्थाचालक प्रसिध्द आहेत. गुंड यांच्या मृत्यूमुळे कसबा परिसरात शोककळा पसरली आहे. गुंड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक तपास सहा. पो. निरी. शिवाजी जायपत्रे करीत आहेत.
0 Comments