Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषदेकडून चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता मोहीम, स्वच्छता राखून प्रशासनाकडून भाविकांची सेवा

 पंढरपूर नगरपरिषदेकडून चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता मोहीम, स्वच्छता राखून प्रशासनाकडून भाविकांची सेवा

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेची लगबग सुरू झाली आहे. येत्या 10 जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाकडून भाविकांना सेवासुविधा पुरवण्याच्या दृष्टीने कामे उरकण्यावर भर दिला जात आहे.भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या चंद्रभागा वाळवंटातील दगड, गोटे, मातीचे ढिगारे उचलण्याचे काम सुरू असून, नदीपात्रात पडलेले खड्डेदेखील बुजवण्यात येत आहेत.

आषाढी यात्रा सोहळा कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्तपणे साजरा होत आहे. त्यामुळे या सोहळ्याला 16 ते 17 लाख भाविक येतील, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. तर, शहर व परिसरातील स्वच्छता करण्यावरही भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने भाविकांची सर्वाधिक गर्दी असते, त्या चंद्रभागा वाळवंटातही स्वच्छता व साफसफाई करण्यात येत आहे.

नदीपात्रात पडलेले दगड, गोठे गोळा करून बाजूला टाकण्याचे काम जेसीबी व डंपरच्या साहाय्याने केले जात आहे. त्याचबरोबर वेळोवेळी नदीपात्रात पडलेले खड्डे तसेच अवैध वाळूउपसा करून पाडलेले खड्डे बुजवण्याचे कामही करण्यात येत आहे. नदी किनारी उगवलेले गवत, काटेरी झुडपे काढण्यात येत आहेत.

नदीकिनाऱयालगतच्या नागरिकांनी टाकलेला कचरा उचलण्याचेही काम नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. याकरिता मुख्य आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक तोडकर यांच्यासह टीम काम करत आहे. या टीमकडून नदीपात्रातील कचरा, फाटकी कपडे, निर्माल्य वस्तूंची विल्हेवाट लावण्यात येत आहे. आषाढीची लगबग सुरू झाली असल्याने पंढरपुरात दररोज लाखोंच्या संख्येने वारकरी हजेरी लावत आहेत.

आषाढी यात्रेकरिता लाखोंच्या संख्येने येणाऱया भाविकांचा चंद्रभागा नदीपात्रात जास्त वावर असतो. स्नान करण्यासाठी मोठी गर्दी असते. त्याचबरोबर भजन, कीर्तन व प्रवचनही दशमी, एकादशीला असते. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून जाते. या वाळवंटात भाविकांना अस्वच्छतेचा त्रास होणार नाही, याची काळजी घेत साफसफाई व स्वच्छता करण्यात येत आहे. चार ते पाच दिवसांत चंद्रभागा वाळवंट चकाचक करण्यात येईल.

- अरविंद माळी, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद

Reactions

Post a Comment

0 Comments