श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखी सोहळा समितीच्या वतीने आवाहन

पुण्यापुढील वारीमार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्याचे आवाहन
पुणे (अनिकेत मुळीक):- मुंबईसह इतर भागातील वाढती कोरोना संख्या पाहता यंदाच्या वारीकडून १४-१६ मार्च २०२० मर्कज सारखे कोरोनाचे संकट उभे राहायला नको, म्हणून सर्वांनी सजग राहायलाच हवे. यासाठी आषाढी वारीत संख्येवर नियंत्रण ठेवायला हवे. देहू, आळंदी पासून पुण्यापर्यंत पायी वारी करणाऱ्यांची संख्या मर्यादीत असते. परंतु पुण्यानंतर ही संख्या वाढत जाते. त्यामुळे पुण्यानंतर वारीतील संख्येवर नियंत्रण असायला हवे, असे विनम्र आवाहन श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखी सोहळा समितीच्या वतीने शासन आणि वारकरी यांना करण्यात आले आहे.
श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखी सोहळा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. संदीप महिंद गुरुजी बोलत होते. यावेळी अॅड. राहुल कदम, अमित बडदे, सुधीर इंगवले उपस्थित होते.डॉ. महिंद गुरुजी म्हणाले, केवळ लस घेतल्याच्या प्रमाणपत्राच्या भरवश्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. लसीकरण झाले म्हणजे संसर्गमुक्तीची पातळी प्राप्त केली, असे होत नाही. वैयक्तिक पातळीवर देखील वारकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे. वारीत सहभागी दोन व्यक्तीतील आवश्यक सुरक्षित अंतर, मुखपट्टी, ताप-थंडी-संसर्गाचे त्वरीत निदान करुन घ्यायला हवे.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने देखील वारीतील आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वच संस्थांशी बोलून, त्यांच्यासाठी आवश्यक ते शासकीय आदेश काढून ताप-खोकला आदी संभाव्य कोरोना लक्षणांची तातडीने खात्री करुन आवश्यक तपासण्या वारीतच करून घ्यायला हव्यात.
अँड कदम म्हणाले- दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगडाहून यावर्षीच्या झालेल्या प्रस्थानासह आषाढी वारीत गेली २८ वर्षे अखंडितपणे पायी चालण्याची परंपरा जपलेला असा हा श्रीशिवछत्रपतींचा पालखी सोहळा आहे. श्रीशिवरायांचा पायी पादुका वारी सोहळा २०२० - २०२१ च्या कोरोना महामारीच्या शासन निर्बंधित काळातही झालाच होता, परन्तु तोही सामाजिक भान राखून अगदीच सीमित संख्येने म्हणजेच केवळ ५ जणातच. आता काहीशी अनुकूलता निर्माण झाली तरीही यावर्षीही आम्हीं पादुका प्रवासात १०-१५ संख्येचीच सीमा राखली आहे. तद्वत वर्तमानातील संभाव्य परिस्थितीचे भान राखून प्रत्येक पालखी सोहळ्याने नि वारकऱ्यांनी कमीत कमी संख्येनेच प्रवास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
0 Comments