शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १४ हजार ३७७ घरांना मंजुरी ; ४५ हजार नागरिकांनी अर्ज केले

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १४ हजार ३७७ घरांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी सात ठिकाणी २ हजार ४६४ घरांचे काम सुरू आहे. ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्वरित घरांची नोंदणी सबंधित ठिकाणी करावी. याशिवाय ६ हजार ६२८ घरांसाठी बांधकाम परवाने सादर झाले आहेत. सुमारे ४५ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. योजनेच्या घटक क्रमांक ३ लाभार्थींसाठी आयोजिलेल्या या दोन दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.शहरात एकूण ७ ठिकाणी गृह प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये मजरेवाडी येथे आर. एस. एम डेव्हलपर्समार्फत २ हजार ४६४ घरे, दहीटणे येथील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेमार्फत १२०० घरे, अक्कलकोट रोड येथील एस. व्ही. स्मार्ट सिटीमार्फत २८८ घरांचे बांधकाम चालू आहे. शहरात भाड्याने राहणारे, स्वत:ची घरे नसलेल्यांसाठी बुधवारी महापालिकेतर्फे हुतात्मा स्मृती मंदिराच्या आवारात मेळावा झाला.महाहौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मजरेवाडी येथे ३ हजार ७१० घरे बांधत आहे. सलगर वस्ती व अंत्रोळीकर नगर येथील काम प्रगतिपथावर आहे. पत्रकार भवनशेजारी पत्रकारांकरिता २३८ घरांचे काम चालू आहे. येथे आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न घटकांसाठी घरकुलं उपलब्ध आहेत. घर घेणाऱ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत एकूण २.५ लाखांचे अनुदान दिले जाते. यासह इतर माहिती यावेळी देण्यात आली.या वेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक अभियंता शांताराम अवताडे, हिदायत मुजावर, आदिल मौलवी, शैलेश करवा, तांत्रिक तज्ज्ञ सिद्धाराम मेंडगुदले, नागनाथ पद्मगोंडे, स्वप्निल गायकवाड, पूजा भुतनाळे आदी उपस्थित होते.
0 Comments