अकलूज मध्ये स्थूलत्व व मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत डॉ.दीक्षित यांचे व्याख्यान
डॉ.नंदकुमार देवडीकर यांचे पुण्यतिथी निमित्त व्याख्यांनाचे आयोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अकलूज मध्ये जग प्रसिद्ध व्याख्याते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे स्थूलत्व व मधूमेह मुक्त भारत आभियान अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी दिली.
सदरचे व्याख्यान दिनांक 21 मे रोजी पाटीदार भवन बायपास रोड, येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. पुढे बोलताना डॉ.श्रीकांत देवडीकर म्हणाले की डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यापासून प्रेरणा घेऊन, डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१३ पासून “स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व" अभियान सुरु केले आहे. या अभियानात ४१ देशातील लाखो लोक सहभागी झालेले आहेत. संपूर्णपणे विनामूल्य असलेले हे अभियान देशात आणि परदेशातही अतिशय लोकप्रिय झाले आहे.या अभियानाची, जीवनशैलीची, त्यात मिळालेल्या यशाची आणि पुढील शक्यतांची माहिती समस्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी या उद्दिष्टाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षित सर जीवनशैली बाबत मार्गदर्शन करतील आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन करतील.
२०१८ मध्ये या अभियानाचे ध्येय गाठण्यासाठी असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल अर्थात 'अडोर' या धर्मादाय संस्थेची स्थापना पुण्यात करण्यात आली. आज अडोर तर्फे देशात १३ शहरात मधुमेह मुक्ती केंद्रे आणि २१ ठिकाणी डॉ. दीक्षित जीवनशैली विनामूल्य सल्ला केंद्रे चालवली जातात. या केंद्रांचा फायदा आजवर हजारो रुग्णांनी घेतला आहे.
आज भारतात मधुमेहाचे ७.७ कोटी रुग्ण आहेत. या पैकी निम्म्या लोकांना त्यांना मधुमेह आहे हेच माहीत नसते! जवळपास इतक्याच प्रमाणात मधुमेह पूर्व अवस्थेतील लोक आहेत. मधुमेहाच्या आणि त्यात होणाऱ्या गुंतागुंतींच्या उपचारांचा खर्च भारतासारख्या देशाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे त्याचा प्रतिबंध करणे हेच श्रेयस्कर होईल.
या अभियानात अशा जीवनशैलीचा पुरस्कार केला जातो .जी फुकट आहे, त्यासाठी डॉक्टर लागत नाही, कोणतेही उपकरण लागत नाही, बाजारातून कोणतीही पावडर विकत घ्यावी लागत नाही आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर व्यक्ती आनंदाने तिचे अनुकरण करू शकते.
या जीवनशैलीचा अंगीकार केल्याने वजन तर कमी होतेच पण मधुमेह प्रतिबंध आणि मुक्तीही मिळू शकते हे अभियानातील आजवरच्या अनुभवावरून आणि संशोधनावरून लक्षात आले आहे.
अभियानाद्वारे राबवण्यात आलेले संशोधन प्रकल्प, इतर उपक्रम, मिळालेले यश आणि त्याचा मधुमेह या भयंकर आजारावर होणारा परिणाम तसेच देशासाठी त्याचे महत्व आणि भविष्यातील दिशा याचा उहापोह ते करणार आहेत.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर, डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी केले आहे.
0 Comments