केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य शेतकरी व नागरिकांचे जीवनमान उंचावले.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
सोलापूर, (कटुसत्य वृत्त): शेतकरी आणि सामान्य गरीब नागरिकांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केंद्र शासनाने विविध लोक कल्याणकारी योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आझादी का अमृत महोत्सव आणि गरीब कल्याण संमेलनाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे श्री. आठवले यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी उपस्थित शेतकरी आणि लाभार्थी यांच्याशी राज्यमंत्री आठवले यांनीही संवाद साधला. यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, शबरी कृषी प्रतिष्ठानच्या संस्थापिका श्रीमती उर्मिलादेवी गायकवाड, शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. व्ही.एम अमृतसागर, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ.राजीव मराठे, राजाभाऊ सरवदे तसेच जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी बांधव उपस्थित होते.
श्री.आठवले म्हणाले, देशातील शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे. या हेतूने कृषी उत्पन्नात वाढ व्हावी, पिकांचा योग्य परतावा मिळावा तसेच शेतकऱ्यांना उत्पादनात वाढीव मदत मिळावी यासाठी देशातील शेतकरी वर्गाच्या प्रगती आणि विकासासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात. यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली असून पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच आत्मनिर्भर भारत कृषी या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरीकांना सक्षम करण्यात आले आहे.
गरीब व सामान्य नागरिकांना आर्थिक लाभ मिळावा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 17 डिसेंबर 2016 रोजी सुरु करण्यात आली. या योजनेमुळे कोरोना काळात सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. मनरेगा अंतर्गत गरीब मजुरांची मजुरी वाढविण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून देशातील 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. आवास योजनेतून लोकांना घरे देण्यात आली. गरीब आणि शेतकरी वर्गाला उभे करण्याचे काम केंद्र शासनाने केले असल्याचेही यावेळी आठवले म्हणाले.
याप्रसंगी आभासी माध्यमातून शिमला येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास देखील केंद्रीय मंत्री आठवले यांनी शेतकऱ्यांसोबत सहभाग नोंदवला. शिमला येथील संपूर्ण कार्यक्रम स्क्रिनद्वारे यावेळी कृषी विज्ञान केंद्रात दाखवण्यात आला. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी तसेच अनेक योजनांचे लाभार्थी उपस्थित झाले होते.
No comments:
Post a Comment