Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीच्या पाण्यापासून एकही गाव वंचीत रहाणार नाही -आमदार शहाजीबापू पाटील

शेतीच्या पाण्यापासून एकही गाव वंचीत रहाणार नाही -आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला शाखा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ

             सांगोला (कटुसत्य वृत्त): नागरिकांनी फक्त मागणी करा मी तुमची कामे करण्यासाठी आमदार म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करीत आहे. या बंदिस्त पाईपलाईनच्या कामामुळे येणाऱ्या वर्षभराच्या काळात हा परिसर हिरवागार होणार आहे. तसेच अजून वंचीत  राहिलेल्या भागातील शेतीला पाणी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच त्याला ही यश येईल व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी तसेच तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यापासून एकही गाव वंचीत रहाणार नाही असा ठाम विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

             सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी निरा उजवा कालव्याच्या सांगोला शाखा कालवा कि मी ८५ ते १०३ या १८ किलोमीटर अंतर असलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे वाढेगाव येथे गुरुवार १२ मे  भूमिपूजन संपन्न झाले. या बंदिस्त पाईपलाईनमुळे आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव, देवळे आणि सावे या पाच गावातील २ हजर १५९ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने या गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. हे काम कमीत कमी दिवसात पूर्ण एक वेगळा विक्रम करा अश्या सूचना या वेळी अधिकाऱ्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या.

             यावेळी मा. आमदार दीपकआबा साळुंखे -पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, किसान आर्मीचे प्रफुल कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे- पाटील म्हणाले, आमदार शहाजीबापू पाटील आमदार झाल्यापासून सांगोला मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलेल्या दिसत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून आमदार शहाजीबापू पाटील यांनी विक्रमी निधी मतदार संघासाठी आणला आहे.

             नीरा उजवा कालव्याच्या सांगोला शाखा कालव्याच्या कि.मी. ८५ ते १०३ बंदिस्त पाईपलाईन  कामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शूभहस्ते व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बाबुराव गायकवाड, शिवसेना नेते प्रफुल कदम, तानाजीकाका पाटील, सूर्यकांत घाडगे, मधुकर बनसोडे, दीपक ऊर्फ गुंडा खटकाळे, सुनिल भोरे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले, उपअभियंता एस.एस.पाटील, प्रथमेश कंट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी संजय इंगोले, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी वाढेगाव, आलेगाव, मेडशिंगी, सावे, देवळे या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments