Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरला "मामा" बनविणाऱ्या भारणेना "उजनी चे पाणी" कदापि घेऊ देणार नाही

सोलापूरला "मामा" बनविणाऱ्या भारणेना "उजनी चे पाणी" कदापि घेऊ देणार नाही

              मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी जलाशयावर अवलंबुन योजना आजही अपूर्ण असताना, इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन साठी पवार ठाकरे सरकार कोट्यवधी रुपये देतात, हा खुनशी डाव आहे. उजनी जलाशय हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे असून योजनेचे नाव बदलून अथवा जुनी योजना आहे असे सांगून सोलापूरकरांच्या डोक्यात दगड घालण्याचे महापाप बारामती आणि इंदापूरकर करत असून उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही  असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.

              इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला 348 कोटी रुपये मंजूर केल्याचा अध्यादेश निघाल्यानंतर मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची तातडीची बैठक पार पडली. यावेळी विविध पक्षाच्या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

              यावेळी बोलताना जलतज्ञ अनिल पाटील म्हणाले की, इंदापूरकर यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पाणी पळविण्याचा डाव आखला आहे. वास्तविक पाणी नेण्यासाठी उजनीमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक नाही संपुर्ण वाटप झाले आहे. मात्र या बद्दल बोलायला कोणीही लोकप्रतिनिधी शिल्लक नाही हे मोठे दुर्दैव आहे. युवा भिम सेनेचे महेश डोलारे म्हणाले की, सोलापूर शहरात आठ दिवसा आड पाणी येते, आमचे पाणी नेऊन महिन्याला एकदा देणार का..? निर्णय रद्द नाही झाला तर पालकमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही. शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर म्हणाले , बारामतीकरांनी घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्र्यांना कदाचित माहीत नसावा, याबाबत मी लवकरच वर्षा अथवा मातोश्री निवासस्थानी त्यांची भेट घेऊन उजनी बाबत ची वस्तूस्थिती सांगणार आहे.

              यावेळी उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे, सचिव माऊली हळणावर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, जलतज्ञ अनिल पाटील, दत्तात्रय मोरे, भाजपचे भारत माने, शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर, वाल्मिकी महासंघाचे गणेश अंकुशराव, लक्ष्मण धनवडे, अॅड. बापूसाहेब मेटकरी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, महेश डोलारे, दिलीप गायकवाड, द्रोणाचार्य लेंगरे, नीलेश जरग, गणेश शेटे, गणेश चव्हाण, विकास गायकवाड, आनंद जाधव यांच्यासह उजनी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

              उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्रयांनी पुढाकार घ्यावा, याचे निवेदन उजनी धरण पाणी बचत समितीच्यावतीने खा.अनिल देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. तसेच उजनीचे पाणी इंदापूरला पळवण्याच्या या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे, याचा अनिष्ट परिणाम पक्षावर होऊ नये आणि सोलापूरकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर तोडगा काढावा या विनंतीचे निवेदन माढा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे नेते संजयबाबा कोकाटे व शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनीही दिले.

              गेल्या वर्षा ते दीड वर्षांपूर्वी असाच ५ टीएमसी पाणी पळविण्याचा प्रकार जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी केला होता, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेनी स्थगिती दिल्यामुळे हा प्रश्न थांबला होता. परंतु  या प्रश्नाने पुन्हा तोंड वर काढले आहे. इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजना मंजूर केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. खरंतर सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच उजनी धरणावर अवलंबून आहे. सर्व एमआयडीसी आणि पिण्याच्या पाण्याची तहान हेच धरण भागवते. पण आता याच धरणाचे पाणी इंदापूरला वळवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो. या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच घेतील आणि आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी योग्य भूमिका घेतील ही खात्री आहे. मुख्यमंत्रसोबत होणाऱ्या बैठकीमध्ये अनिल देसाई सुपूर्त केलेल्या निवेदनाची तीव्रता नक्कीच पोचवतील हा विश्वास आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments