बेंबळे परिसरात बिबट्या ची चाहूल ; नागरिकांमध्ये भीती ; पशुधनाची काळजी
.jpg)

आ. बबनदादाच्या सूचनेमुळे फॉरेस्ट खात्याची तत्परता....
सापळे लाउन पेट्रोलिंग करणार...
बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे परिसरात बिबट्याची चाहूल लागली असून रविवार दिनांक 1 मे रोजी रात्री बेंबळे-परिते रस्त्यावर ,उजनी डावा कालवा कि.मी.क्र. 48 च्या पश्चिमेस गावाकडील बाजूस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार युवकांना बिबट्या रस्त्यावरून जात असताना व पुढे गोपाळ ज्ञानोबा काळे यांचे उसात गेलेला दिसून आला.
वृत्तांत असा की डॉ. प्रवीण लोंढे, डॉ.अनिल शिंदे, नवनाथ मुडफुणे व मयूर पवार हे युवक रविवारी रात्री नऊच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून परीते रस्त्याने जात असताना अचानक त्यांचे समोर रस्त्यावर त्यांना बिबट्या आडवा आल्याचे दिसून आले व काही मिनिटात तो गोपाळ काळे यांच्या उसाच्या शेतात निघूनही गेला. त्यानंतर त्यांनी फोन करून व मेसेज टाकून बिबट्या विषयी सर्वत्र नागरिकांना माहिती कळवली. बेंबळे परिसरात सर्वत्र ऊस केळी डाळिंब द्राक्ष पपई अशी बागायती पिके असून 80 ते 85 टक्के शेतकरी आपल्या शेतातच घर बांधून राहत आहेत, सध्या कॅनॉलही भरून वाहत आहे. िबट्याची माहिती समजताच अनेक युवक व नागरिक बॅटर्या घेऊन एकत्र आले व बाजूला असलेल्या ओढ्याच्या काठाने धीटपणे त्याचा शोध घेऊ लागले परंतु काहीही हालचाल किंवा थांगपत्ता लागेना .अनेकांनी अँटमबाँम्बचे बार काढले पण तरीही बिबट्याची हालचाल कुठे दिसली नाही, हा गोंधळ रात्री एक ते दोन वाजेपर्यंत चालू होता. परिते रोड व पांडव ओढा परिसरात किमान दोन ते अडीच हजार नागरिक आपापल्या शेतात कुटुंबासहित राहतात, परंतु प्रत्येक घरातील माणसे रात्रभर जागीच राहिली असल्याचे समजते .सोमवार दिनांक 2 मे रोजी सकाळी वनखात्याचे दोन कर्मचारी आले व काही युवकांच्या मदतीने त्यांनी ऊसाच्या शेतातील पावलांच्या खुणा पाहिल्या व हा निश्चित बिबट्याच असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले व नागरिकांना सुरक्षा घेण्याविषयी सूचना दिल्या.
बेंबळे परिसरात बिबट्या शीरल्याची माहिती आ. बबनदादा शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने वरीष्ठ फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी संवाद साधून बेंबळे येथे भेट देण्याच्या व पिंजरे( सापळे) बसवण्याच्या सूचना दिल्या. आ. शिंदे यांच्या सूचनेनुसार तातडीने हालचाली झाल्या व मोहोळ- माढा -करमाळा चे वनपरिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर साळुंके, मोहोळ चे वनरक्षक एस आर कुडले वन मजूर एस एस मोरे व विकास डोके इत्यादी फॉरेस्ट खात्याचे अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने बेंबळे येथे भेट दिली व पायाच्या ठशावरून हा बिबट्याच असल्याचे खात्री पूर्वक सांगितले. आज रात्रीपासून पेट्रोलिंग करणार असल्याचे व बिबट्याच्या भटकंतीची दिशा लक्षात येताच आम्ही लगेच उद्यापासून दोन ते तीन सापळे लावून त्याला पकडण्याचे प्रयत्न निश्चित करणार असे नागरिकांना त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रात्री घराबाहेर पडू नये, शेतात एकटे फिरू नये, रात्री घराबाहेर मोठ्या लाइटची व्यवस्था करावी व आमच्या पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशा सूचनाही वनखात्याच्या अधिकार्यांनी दिल्या.
या परिसरातील शेतात राहणारे सर्वच नागरिक घाबरलेले असून स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेता येईल परंतु आपल्या गाई म्हशी शेळ्या मेंढ्या या पशुधनाचे काय करायचे अशी भीतीयुक्त काळजी सर्वांना लागून राहिली आहे. आ. बबनदादा शिंदे यांच्या सूचनेमुळे फॉरेस्ट विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेंबळे परिसरातच ठाण मांडले आहे व बिबट्याच्या हालचालीवर त्याची सतत नजर राहाणार आहे , आबालवृद्ध स्त्री-पुरुष नागरिक मात्र भयभीत असून हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना करत आहेत.
0 Comments