द्राक्ष छाटणी व्यवस्थापन विषयावर शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न.!


कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- द्राक्ष पिकामध्ये मालाच्या तोडणी नंतर करण्यात येणाऱ्या खरड (एप्रिल छाटणी) ही शास्त्रीय पद्धतीने होणे जरुरीचे आहे तसेच रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांवरती भर द्यावा असे आवाहन डॉ.सोमकुंवर यांनी केले.
ते १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने कंपनीतर्फे माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर. जी.सोमकुंवर तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.निशांत देशमुख हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते.
'पुढे बोलताना ते म्हणाले, वाढत्या तापमानाचा घड निर्मितीवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी काही सोप्या उपाययोजना बद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.तसेच संजीवंकाचा उत्तम परिणाम साधण्यासाठी त्यांचा वापर करताना बागेतील मायक्रो क्लायमेटचा अभ्यास करूनच छाटन्या करव्यात.छाटणी करण्यापूर्वी बागेतील मातीचे परीक्षण करूनच शिफारसीत खतांच्या मात्रा दिल्यास शाश्वत उत्पादनाबरोबरच खर्चात बचत करणे शक्य होईल.सद्यस्थितीमध्ये निविष्ठांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे,दर्जेदार व भरघोस उत्पादन घेण्यासाठी कॅनॉपी व्यवस्थापन तसेच काड्यांची संख्या-जाडी,पानांचा आकार-संख्या इ. बाबींचे सूक्ष्म नियोजन केल्यास पीक रोगांना कमी बळी पडते व सूर्यप्रकाश सर्वत्र खेळता राहिल्याने उत्पादनात वाढ होते.रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांवरती भर द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.“क्लोन” ही द्राक्षाची जात शेतकऱ्यांना बेदानासाठी फायद्याची ठरत आहे.त्याचबरोबर “मांजरी किसमिस”ही जात देखील शेतकऱ्यांना बेदाना निर्मितीसाठी खूप फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यानी या जातीस पसंती देऊन मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे यांनी भूषवले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.
द्राक्ष पिकावरती होणारे नवनवीन संशोधन आणि उपलब्ध शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहाचवण्यासाठी द्राक्ष संशोधन केंद्र नेहमीच प्रयत्नशील असते.यावेळी द्राक्ष उत्पादनातील सूर्यप्रकाशाचे महत्व या विषयावरती मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख म्हणाले द्राक्ष वेलींना मुबलक सूर्यप्रकाश मिळाल्यास जास्त प्रमाणात प्रकाश संश्लेषण क्रिया घडून येते पर्यायी कार्बोहायड्रेटचे संचयन होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते.या करिता वेलींचे कॅनॉपी व्यवस्थापन करणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायादेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील,कंपनीचे व्हाईस चेअरमन श्रीकांत पाटील,कंपनीचे संचालक पोपट खापरे,नितीन कापसे,महेश मारकड,महेश डोके,प्रशासकीय अधिकारी राहुल वरपे व सर्व कर्मचारी वृंद व मोठ्या संख्येने द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सध्याच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष शेती बऱ्याच अंशी फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे आवश्यक असल्याचे मत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.द्राक्ष लागवडीसाठी चालना देण्यासाठी लवकरच “मनरेगा” योजनेमध्ये यासंबंधीचा शासन निर्णय येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच कंपनीचे चेअरमन धनराज शिंदे हे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की,भविष्यात शेतकर्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनावरती भर देणे आवश्यक असून कंपनीद्वारे उभारण्यात आलेल्या अद्ययावत पॅकहाऊस चा फायदा करून घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले.तसेच प्रत्येक तालुक्यात सुसज्ज पॅक हाऊस, निर्यात सुविधा केंद्र उभारणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.लवकरच सुसज्ज अशी माती,पाणी,पान,देठ परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये येईल असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विविध पिकावरील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने “शेतकरी संवाद” हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे व शेतकरी बांधवांचे आभार नितीन बापू कापसे यांनी मानले.यावेळी तालुक्यतील बहुसंख्य द्राक्ष उत्पादकानी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला.
0 Comments