पालखी सोहळ्याच्या सर्व प्रथा परंपरा जपण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 26, 2022

पालखी सोहळ्याच्या सर्व प्रथा परंपरा जपण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

पालखी सोहळ्याच्या सर्व प्रथा परंपरा जपण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

               पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संताच्या पालखी सोहळ्याच्या प्रथा व परंपरेचे जतन करावे. यासाठी पालखी तळ व पालखी मार्गावरील त्याचबरोबर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे तातडीने पूर्ण करावीत.  तसेच  पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी , भाविकांना  कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

               संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील पालखी मार्गाची तसेच विविध पालखी तळांची  पाहणी श्री शंभरकर यांनी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर,  उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रम कदम, बसवराज शिवपुजे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जगदिश निंबाळकर,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी,कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे श्री.पवार तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

               यावेळी श्री शंभरकर म्हणाले, यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे, पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा,  अखंडीत वीज पुरवठा, शौचालय व्यवस्था,  तसेच स्वच्छतेबाबत नियोजन करावे. यासाठी संबधित विभागाने समन्वय साधून कामे तत्काळ पूर्ण करावीत.

               पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे भंडीशेगांव, ता.पंढरपूर येथील संत सोपान महाराज पालखी तळास जागा अपुरी पडत असल्याने पर्यायी जागा म्हणून जलसंपदा विभागाच्या जागेच्या ठिकाणी  स्वच्छ पाणी,  विद्युत पुरवठा, तात्पुरती शौचालय, स्वच्छता याबाबत नियोजन करुन तात्काळ कार्यवाही करावी.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यात  दोन्ही पालखी महामार्गावर सुरु असलेल्या उड्डाण पुलांची कामे  तात्काळ पुर्ण करावित ज्या ठिकाणी कामे अपुरी असतील त्या ठिकाणी तत्काळ पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

               जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर  माऊली महाराज  पालखी  सोहळ्याचे आगमन 4 जुलै तर जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 5 जुलै 2022 रोजी होणार आहे. या सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक तसेच दिंड्या सोबत वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात.  येणाऱ्या पालखी सोहळ्यास  सुरक्षेबाबत तसेच  पालखी मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याबाबत नियोजन करावे.  लाखो वारकऱ्यांचा चैतन्यदायी सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी  होते. याठिकाणी  सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणही सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना श्रीमती सातपुते यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages