बालविवाहावर आता ऑपरेशन परिवर्तन। रुपाली चाकणकरांनी घेतली सोलापूर एसपींची भेट
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा अनेकदा बालविवाहात राज्यात अव्वल राहिला असून कोरोनातही एकट्या सोलापूर जिल्ह्यात जवळपास १०० बालविवाह रोखण्यात आले. कायद्याने बंद झालेली इतिहासकालिन बालविवाहाची प्रथा पुन्हा डोके वर काढू लागली असून ही प्रथा रोखण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन बालविवाह रोखण्यासंबंधी चर्चा केली. त्यातून राज्याचा प्लॅन तयार करून आगामी काळात त्याला मुर्त स्वरूप देऊन त्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी तक्रादार महिला तथा मुलींसाठी पोलिसांनी केलेली सोय व महिला सुरक्षा कक्षाची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना महिला सुरक्षितता, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ देशपातळीवर पोचले असून, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत त्याचे कौतुक केले होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. याचवेळी बालविवाह वाढीची कारणे, रोखण्यासाठीचे उपाय यावर सविस्तर चर्चा पार पडली. ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या धर्तीवर आता बालविवाह रोखण्यासाठी नवे ऑपरेशन राबविण्याचा निर्णय यावेळी झाला. तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतरांशी चर्चा करुन त्या उपक्रमाला मुर्त स्वरूप दिले जाणार आहे.
0 Comments