आपल्या गावची ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी पिरटाकळीच्या अधिकारी सुपुत्राचे प्रामाणिक प्रयत्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आपल्या गावची ग्रामपंचायत सर्वजण मिळून एकत्र येऊन बिनविरोध करा, मी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख रुपये स्वनिधी देईन असा शब्द देणारे पिरटाकळीचे सुपुत्र आणि जि.प. चे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार यांनी आपला दिलेला शब्द गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूर्ण केला आहे. सुतार परिवारातील सदस्य आणि ज्ञानेश्वर सुतार यांचे सुपुत्र स्वप्निल सुतार यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ज्ञानेश्वर सुतार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिरटाकळी वासियांनी गतवर्षी जानेवारी २०२१ मध्ये पिरटाकळीची ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. जिल्ह्यात गेली अनेक वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून अनेक प्रेरणादायी ग्रामपंचायतीचा आदर्शवत कारभार पाहीलेल्या ज्ञानेश्वर सुतार यांना आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचीही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मनोमन इच्छा होती. त्यामुळे निवडणूक शांततामय मार्गाने आणि निकोप वातावरणात बिनविरोध व्हावी या उदात्त हेतूने गावातील या अधिकारी सुपुत्राने आपल्या गावाला दिलेला एक लाख रुपये स्ववर्गणीचा शब्द पूर्ण करत पिरटाकळी वासीयांचे केवळ मनच जिंकले नाही तर आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासालाही खूप मोठा हातभार लावल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. बिनविरोध ग्रामपंचायतीसाठीच्या बक्षीस रक्कमेतून ग्रामदेवत येडेश्वरी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करून विकास कामांना सुरवात झाल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.
यावेळी पिरटाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच माऊली पाटील , उपसरपंच हनुमंत खडसुळे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव थिटे ,सारंग थिटे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तू दादा थिटे, संजय निंबाळकर, राष्ट्रवादीचे युवा नेते राजू खराडे, स्वप्नील सुतार ,प्रभाकर महामुनी, नवनाथ कदम, जगन्नाथ कदम, बाळू फंड, आबा थिटे, सुयश मोटे, बाळू गवळी, विकास थिटे, श्रीमंत जाधव, इत्यादिं सह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments