'आज तुम्हारा है, कल मेरा आएगा' भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर डागली तोफ

सोलापूर (कटुसत्य वृत्त):- ईडीची भीती घालून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आतमध्ये घालण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. जो भाजपात जाईल, तो कारवाईतून बाहेर आहे. आम्ही चुकलो, तर आम्ही घरी बसू. आमची सत्ता गेल्यावर आम्हीही घरी बसलो. पण असले राजकारण केले नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा सत्तेत आलो. जनतेच्या कोर्टात जाऊन पुन्हा निवडून आलो, हे सांगताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शायरीची मदत घेत वक्त है बदल जाएगा... आज तुम्हारा है, कल मेरा आएगा, शरीफ है हम, किसीसे लडते नहीं…मगर जमाना जानता है, के किसीके बाप को डरते नहीं”, अशा शब्दांत भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर तोफ डागली.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने शुक्रवारी हेरिटेज येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष काका साठे, माजी आमदार दीपक साळुंखे, पक्ष निरीक्षक शेखर माने, दीपाली पांढरे, किशोर माळी, संतोष पवार, भारत जाधव आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षातील नेते पूर्णपणे संपवण्यासाठी भाजप महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. तसेच गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात असा दुर्दैवी विरोधी पक्ष पाहिला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या देशात आणि राज्यात केवळ जाती-धर्मावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जातीयवादी पक्षांनी सुरू केला आहे. मागील निवडणुकीत पवारांसोबत असलेले राज ठाकरे ईडीची नोटीस येताच विरोधात बोलत असल्याची टीका त्यांनी केली.
0 Comments