Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल तर जनतेत जाऊन स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करा ; रडीचा डाव खेळू नका - छगन भुजबळ

सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल तर जनतेत जाऊन स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करा ; रडीचा डाव खेळू नका - छगन भुजबळ

          मुंबई (नासिकेत पानसरे):- सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल तर जनतेत जाऊन स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करा. आम्ही कसे चूक आणि तुम्ही कसे बरोबर हे सिद्ध करा. मात्र असे न करता भाजप सरकारी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. 

          अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज जनता दरबारासाठी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या काही प्रश्नांना छगन भुजबळ यांनी उत्तर दिले. 

          मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राजकारणातील लढाई आपण जनतेच्या कोर्टामध्ये लढूया असे सांगितले होते परंतु तुम्ही (भाजप) मध्येच शिखंडीसारखा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहेत असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. 

          ईडीने कारवाई केल्यानंतर जामिन लवकर मिळत नाही.मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत याचा अर्थ भाजपमधील नेते सूचिर्भूत आहेत का? असा संतप्त सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे. 

          काही नेत्यांनी तर अशा प्रकारच्या कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश करून टाकला आणि आता आम्हाला शांत झोप लागते असे बोलत आहेत. हा सगळा प्रकार म्हणजे रडीचा डाव आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. 

          जसं ऊस पिळवटून टाकल्यानंतर त्याचं फक्त चिपाड उरतं. अगदी त्याचप्रकारे माणसालासुद्धा पिळवटून टाकण्याचं काम या केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे होत आहे. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनीसुद्धा मनी लॉण्ड्रींग कायद्याविरोधात भाष्य केले आहे. तसेच आताही सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांचा अवास्तव वापर केला जातोय असे मत व्यक्त केले आहे याची आठवणही छगन भुजबळ यांनी करुन दिली. 

          महाविकास आघाडी सरकारचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे विरोधकांना आणखी दोन वर्ष थांबायला वेळ नाही. जर आम्ही काही चुकीचे केले असेन तर जनता तुम्हाला निवडून देईलच. मात्र विरोधकांना थांबण्यासाठी सुद्धा सवड नाही असा टोलाही छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला. 

          विरोधकांच्या या भूमिकेला कायद्याने उत्तर देण्यासाठीसुद्धा बरीच वर्ष जातील. त्यामुळे आपण दोषी नाहीत हे आम्हाला फक्त प्रसारमाध्यमांमार्फतच जनतेपर्यंत पोहोचवावे लागेल. भाजप करत असलेला अन्याय व दादागिरी लोकांना कळत आहे. बऱ्याच जणांना ईडीच्या नोटीसा आल्यानंतर त्यांनी केलेला भाजपप्रवेश हादेखील लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोकांना काही समजत नाही अस भ्रम पाळू नका. लोकं निवडणुकांच्या वेळेला मतदानाद्वारे यावर तोडगा काढतात. त्यामुळे तुम्हाला लढायचं असेल तर राजकारणाच्या मैदानात येऊन लढा. ईडी, सीबीआयच्या पाठीमागे लपून लढू नका असा इशाराही छगन भुजबळ यांनी यावेळी दिला. 

          एकेकाळी काही विरोधक मोदी व भाजपच्या विरोधात बोलत होते. मग त्यांना ईडीची नोटीस गेली आणि त्यांच बोलणं थांबलं. कोहीनूर टॉवर गैरव्यवहार व ३५० कोटींची खंडणी हे सारे प्रकार आपण बातम्यांमधून वाचले आहेत. मात्र आता त्यावर काहीच वाच्यता नसते, असेही छगन भुजबळ म्हणाले.

          राजू शेट्टी यांचं नाव आपण विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे दिले होते. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना त्या पदावर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यपालांनीच त्या जागांवर शिक्कामोर्तब केले नव्हते. त्यांचे काही गैरसमज झाले असतील म्हणून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले असावेत असे छगन भुजबळ राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यावर केलेल्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले.

          न्यायव्यवस्थेत एखाद्या व्यक्तीवर दोष सीद्ध होत नाही तोपर्यंत त्याला जामीन मिळणे हा त्याचा हक्क आहे परंतु ईडी व तत्सम विभागात तसे होत नाही. त्यामुळेच नवाब मलिक, अनिल देशमुख तसेच याआधीचेही काही लोक अजूनही जेलमध्ये आहेत, अशी खंत छगन भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments