राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येऊ देणार नाही : शरद पवार
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येऊ देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. काल (गुरुवारी) शरद पवारांची राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी भेट घेतली.पवारांनी हे वक्तव्य या बैठकीदरम्यान केले आहे.देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालांमध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली. युवा आमदारांनी याच निवडणुकांच्या निकालांबाबत शरद पवारांसमोर आपापले प्रश्न मांडले. त्यानंतर बैठक संपल्यानंतर ज्यावेळी सर्व आमदार जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येऊ देणार नाही.जरी भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखे बरच काही असल्याचे शरद पवार युवा आमदारांशी बोलताना म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवसाला २४ तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यासारखे अनेक गुण आहेत. जे भाजप नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे. त्यासोबतच शरद पवारांनी युवा आमदारांना को-ऑपरेटिव्ह सेक्टर आणि सामाजिक क्षेत्रांशी जोडण्याचाही मंत्र दिला आहे.
0 Comments