नव्या महामार्गालगत मोहोळ नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रमअतिक्रमणे होऊ नयेत म्हणून वृक्षारोपन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ शहरात नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर आळंदी महामार्गालगतच्या रिकाम्या जागेत स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करू नये म्हणून मोहोळ नगर परिषदेने सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूरकडे जाणाऱ्या महामार्गाच्या लगत न्यायाधीश निवास आणि मोहोळ न्यायालय इमारतीचा भाग येतो. सध्या झालेल्या महामार्गाच्या ड्रेनेजच्या भिंतीलगत आणि वॉल कंपाऊंडच्या मध्ये असलेल्या सात फूट जागेमध्ये अतिक्रमण होण्याची चिन्हे होती. ही बाब सदर परिसरातील प्रशासकीय सूत्रांनी मोहोळ नगरपरिषदेचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत त्वरित उपाय योजनेचा भाग म्हणून मोहोळचे मुख्याधिकारी डॉ. डोके यांनी गुरुवारी सायंकाळी चार वाजता सदर ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबवले. विशेष म्हणजे आजवर या भागात अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी प्रशासकीय दायित्व असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर काहीही दक्षता न घेतल्यामुळे हा भाग अतिक्रमित झाला होता. आता सदर भाग अद्ययावत आणि सुटसुटीत व्हावा यासाठी मोहोळ नगरपरिषद प्रशासन दक्ष असल्याचे यावेळी मुख्याधिकारी डोके म्हणाले. मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ़.योगेश डोके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम मोहोळ नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके, बांधकाम अभियंता गणेश बागल,लेखापाल रोहित कांबळे, घरकुल अभियंता योगेश डोके अजित दानोळे,शहर समन्वयक हर्षवर्धन माने,रमजान तांबोळी, राजू शेख इत्यादीसह नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
0 Comments