शहरात चैन स्नॅचिंगचा जिवघेणा प्रकार; दुचाकी चोरी, घरफोडीत वाढ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 18, 2022

शहरात चैन स्नॅचिंगचा जिवघेणा प्रकार; दुचाकी चोरी, घरफोडीत वाढ

 शहरात चैन स्नॅचिंगचा जिवघेणा प्रकार; दुचाकी चोरी, घरफोडीत वाढ


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. मंगळवारी (ता. 15) जुना पुना नाका व जुळे सोलापूर या दोन ठिकाणी मुलींना दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने अनोळखी दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले. एका प्रकरणात दुचाकीस्वारांनी पिस्तुलचा धाक दाखविला तर दुसऱ्या घटनेत अनोळखी दुचाकीस्वारांनी चालत्या दुचाकीवरूनच महिलेच्या गळ्यातून दागिने हिसकावून नेले. तर एका मुख्याध्यापिकेच्या घरातून चोरट्याने तब्बल नऊ लाख 91 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सात पोलिस ठाणे, ढिगभर पोलिस, डिबी पथक, विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, एवढा लवाजमा असतानाही शहर पोलिसांना दुचाकी चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंगवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. भरदिवसा चोरी होऊ लागल्याने महिलांमध्ये घबराट पसरली आहे. घरासमोर हॅण्डल लॉक करून लावलेल्या दुचाकी सकाळपर्यंत राहील की नाही, अशी नागरिकांमध्ये भीती आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून शहरातील बंद घरांवर वॉच ठेवून त्याठिकाणी हमखास चोरी होतेच, असेही चित्र आहे. मंगळवारी न्यु पाच्छा पेठेतील कमलश्री मंगल कार्यालयाजवळील लक्ष्मी अंबादास कंदीकटला या मुख्याध्यापिकेच्या घरातून चोरट्याने 45 हजारांची रोकड आणि नऊ लाख 46 हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. त्यांनी जेलरोड पोलिसांत धाव घेतली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत. त्या मुख्याध्यापिका सहकुटुंब तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरी चोरी केली. तर लष्कर, दक्षिण सदर बझार येथील जिलानी शेरन कुरेशी यांच्या घरासमोरून चोरट्याने दुचाकी चोरल्याची फिर्याद त्यांनी सदर बझार पोलिसांत दिली. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍तांनी ठोस उपाययोजना करून हे प्रकार थांबवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. दुचाकीस्वारांनी हिसकावले महिलेच्या गळ्यातील दागिने सात रस्ता परिसरातील वैशाली विक्रम काटुळे या मंगळवारी (ता. 15) मुलीला शिकवणीसाठी दुचाकीवरून जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीकडे जात होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालत्या गाडीवरून गळ्यातील मिनी गंठण हिसकावले. त्यानंतर वैशाली काटुळे व त्यांची मुलगी दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या गुडघ्याला तर मुलीच्या डोक्‍याला मुक्‍कामार लागला. त्यावेळी गळ्यातील 25 हजारांचे दागिने घेऊन ते दोघे अनोळखी तरुण पसार झाले, अशी फिर्याद काटुळे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. ही घटना जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी परिसरात घडली. तपास पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages