स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा नगरपालिकेस पडला विसर
प्रा.झपके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची काल जयंती. परंतु या दिवशी सांगोला नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर असणारा नेहरूंचा पुतळा मात्र कुठल्याही स्वच्छतेविना दिसून आला. जयंतीच्या निमित्ताने सांगोला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.प्रबुद्धचंद्र झपके हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याकरता गेले असता सदर पुतळा हा कुठल्याही स्वच्छते विना दिसून आला. प्रा.झपके यांनी ताबडतोब स्वतः पुतळा स्वच्छ करण्याकरिता नगरपालिकेमध्ये झाडू आणण्याकरिता गेले असता कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली व त्यांनी ताबडतोब सदर पुतळा स्वच्छ करून घेतला. स्वच्छता सुरू असताना नगरपालिकेचे दोन माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पुतळ्या समोरूनच आपल्या वाहनातून गेले परंतु क्षणभर थांबून काय प्रकार चालू आहे हे देखील पाहण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाही.
इतरवेळी कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेणाऱ्या नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या जयंतीचा मात्र विसर पडावा याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा विषय अनेक वेळा चर्चेत आला परंतु तो चर्चेपुरताच मर्यादित राहिला.
प्रा.झपके यांनी नेहरूंच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक खाजाभाई तांबोळी, मारूती बनकर,दत्तात्रय दौंडे व नागरिक उपस्थित होते.
आयत्या वेळी पुतळा स्वच्छ करून देणारे नगरपालिकेचे कर्मचारी निकोप ठोकळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रा.झपके यांनी विशेष आभार मानले.
0 Comments