आयकर विभागात खेळाडूंची भरती
शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंनी नमुना अर्ज भरण्याचे आवाहन

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाच्या आयकर विभागामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी, प्राविण्यधारक खेळाडूंची भरती होणार आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी प्रमाणित करण्यासाठी 20 ऑगस्ट 2021 पर्यंत नमुना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.
भरतीसाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या, शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. भरतीसाठी पात्र खेळाडूंना शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी क्रीडा संचालनालयाद्वारा प्रमाणित करुन देण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंना फॉर्म-4 खेळाडूंच्या इमेलद्वारे आणि घरच्या पत्त्यावरही पाठविण्यात येणार आहे.
राज्यात कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव असल्याने खेळाडूंनी पुणे येथे व्यक्तीश: उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते. यामुळे जिल्ह्यातील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी विहित नमुन्यामधील फॉर्म-4 प्रमाणित करुन घेण्यासाठी 20ऑगस्ट 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही क्रीडा विभागाकडून कळविले आहे.
0 Comments