वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक: पालकमंत्री भरणे
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देऊ. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी किंवा बुधवारी बैठक घेतली जाणार आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.
उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, नगरसेवक महेश कोठे, गणेश पुजारी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पि. शिवशंकर, सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक डेंगळे- पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी श्री. डेंगळे पाटील यांनी समांतर पाणी वाहिनीबाबतच्या सध्याच्या कामाची स्थिती सांगितले. त्यांनी जॅकवेलच्या कामास जलसंपदा विभागाने स्थगिती दिली असल्याचे सांगितले. त्यावर श्री भरणे यांनी जॅकवेलच्या कामास तत्काळ सुरुवात करावी. 15 जूनपर्यंत काम पूर्ण करावे, असे सांगितले.
पाईपलाईनसाठी भूसंपादन भरपाईपोटी रक्कम वाढणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.
पाईपलाईन योजनेच्या भूसंपादनासाठी अगोदर 55 कोटी रुपये कळवण्यात आले होते. मात्र आता महसूल विभागाने 130 कोटी रुपये कळवले आहे, या वाढीव मागणीमुळे ज्यादा निधी लागणार आहे. या जादा निधीसाठी पुढील आठवड्यात वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत जादा निधीची मागणी केली जाईल, असे श्री भरणे यांनी सांगितले. याचबरोबर सर्वसाधारण आणि महिलांसाठीच्या खास हॉस्पिटलसाठी निधीची तरतूद करण्याची विनंती करणार आहोत.
या बैठकीस महानगरपालिकेचे अभियंता संजय धनशेट्टी, सिद्धेश्वर उस्तुर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार उपस्थित होते.
0 Comments