सोलापूर जिल्ह्यात आजपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच मिळणार इंधन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात असताना आता अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोल आणि डीझेल विकण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत नव्याने आदेश काढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २१ मे पासून सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व उद्योग व्यवसाय बंद असले तरी पेट्रोल आणि डीझेल पंपावर मात्र विक्री सुरु होती पण आता यावरही बंधने आली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांना विक्री करण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला असून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे.
पूर्ण लॉकडाऊन असतानाही पेट्रोल पंपावर दुचाकी, चार चाकी वाहनांची गर्दी दिसून येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील खाजगी व सरकारी वाहने, वैद्यकीय सुविधा पुरविणारी वाहने, शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडिया कर्मचारी,माल वाहतूक करणारी वाहने यांच्यासाठीच पेट्रोल पंप सुरु राहतील परंतु ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
या अत्यावश्यक सेवेतील वाहना व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनांना आता पेट्रोल अथवा डीझेल मिळणार नाही. जिल्हाधिकारी यांचा हा आदेश येताच त्याची अमलबजावणी सुरु झाली आहे.
या निर्णयामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी कमी होणार असून रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांनाही ब्रेक लागणार आहे.
0 Comments