Hot Posts

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील भटका विमुक्त समाज उपेक्षीतच : सूर्यकांत भिसे

लॉकडानच्या काळात राज्यातील भटका विमुक्त समाज उपेक्षीतच : सूर्यकांत भिसे 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- गावात घर नाही, शिवारात शेत नाही, बाजारात पत नाही आणि कुणी उधारही देत नाही अशा राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला राज्य शासनाने लॉकडाउनच्या काळातही उपेक्षितच  ठेवले आहे अशी खंत भटके विमुक्त विकास मंचचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी व्यक्त केली आहे . 

भिसे म्हणाले, भटका विमुक्त समाज हा विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड घेवून उपजीविकेसाठी गावोगाव भटकंती करीत असतो. उपजीविकेसाठी नदी, नाले, ओढ्याच्या काठावर पाल ठोकून राहणाऱ्या या समाजाला गावात घर नसल्याने ना त्यांच्याकडे रेशनकार्ड मिळत नाही, ना त्यांचे मतदार यादीत नांव नाही. त्यामुळे या समाजाकडे राजकीय पुढाऱ्यांचे कायमच दुर्लक्ष राहिले आहे. आज देश स्वतंत्र होवून जवळपास ७५ वर्षे झाली . परंतु हा समाज आजही पारतंत्र्यात आहे. या समाजाच्या उथ्थानासाठी कोणत्याही शासनाकडे ठोस कार्यक्रम नाही . अठराविश्व दारिद्र्यात हा समाज आजही भटकंती करीत आहे. 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पर्यंत भटक्या विमुक्त समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का जात नाही, हा समाज गावकुसात येत नाही तोपर्यंत हा देश स्वतंत्र झाला असे मी मानत नाही असे सांगितले होते. ते आजही खरे आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाउन जाहिर करताना प्रत्येक घटकाला त्यामध्ये समाविष्ट केले. त्यांच्या भाकरीचा विचार केला . परंतु भटक्या विमुक्तांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय जाहिर केला नाही. 

भटका विमुक्त समाज हा शूर, साहसी आहे, कलावंत आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून तो लोकांचे मनोरंजन करतो आणि त्यातून आपली उपजीविका करतो. लॉकडाउनमुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. या समाजाने आपली कला कोणापुढे सादर करायची व कशी अर्थप्राप्ती करायची. त्याला कोण भीक देणार हा सर्व प्रश्नच आहे. महाराष्ट्रात भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या ही २ कोटीपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा सामना करीत हा समाज गावकुसाबाहेर पाल ठोकून रहात आहे. त्याला शासनाने अधार द्यावा, त्यांच्या पालावर जावून किमान जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करावे अशी मागणी भिसे यांनी केली आहे .

Reactions

Post a Comment

0 Comments