महसूल व पोलीस यंत्रणा निवडणुकीत गुंतल्याने मोहोळ तालुक्यात पुन्हा वाळू चोरांचा धुडगुसवाळू चोरीला नदीकाठावरील राजकीय नेत्यांचे पाठबळ

मोहोळ (कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ महसूल व पोलिस प्रशासन विवीध निवडणुकीत गुंतल्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ उठवण्याचा निर्णय मोहोळ तालुक्यातील सीना व भीमा नदी काठावरील वाळू माफियांनी घेतला आहे. दररोज मध्यरात्री ट्रॅक्टर यारी व बैलगाडीच्या सहाय्याने वाळू काढून सदरची वाळू नदी काठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत टाकून तिची विक्री टेम्पो द्वारे सोलापूर बार्शी उस्मानाबाद लातूर पुणे या भागात करण्याचा गोरखधंदा पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मोहोळ तालुक्यातील सीना नदी मधील वाळू नाहीशी होऊन त्या ठिकाणी केवळ दगड गोटे व ओसाड पात्र निदर्शनास येणार आहे. याचा मोठा परिणाम या भागातील जलस्रोतावर होऊन या भागातील शेतकरी देशोधडीला लागण्याची दाट शक्यता आहे. विशेष दुर्दैवाची बाब म्हणजे सीना नदी काठावरील राजकीय नेते मंडळी देखील अशा वाळू चोरी करणाऱ्या लोकांच्या बाजूने असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे वाटोळे होण्यास सर्वपक्षिय राजकीय नेते देखील तितकेच कारणीभूत असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील बोपले एकुरके मलिकपेठ नरखेड हिंगणी आष्टे लांबोटी अर्जुनसोंड मुंढेवाडी रामहिंगणी पोपळी गोटेवाडी विरवडे खुर्द पाकणी तिर्हे या भागातून सीना नदी जाते. गेल्या अनेक वर्षापासून वाहणाऱ्या या सीनामाई नदीमुळे दोन्ही बाजूचा काठावरील शेती हिरवीगार होऊन नंदनवन झाले आहे. चार वर्षांपूर्वी आलेल्या नदीला महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वाळू वरील भागातून मोहोळ तालुक्याचे हद्दीत येऊन साठली. या संधीचं सोनं करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील वाळू माफियांनी आपापल्या गावातील नदी मधील वाळूचा वारेमाप उपसा करणे सुरू केले.वाळू काढायची एकाने आणि शेत जमिनीवरशबोजा दुसऱ्याच्या अन गुन्हे दाखल चक्क चालकावरच असा सावळा गोंधळ सुरू आहे.
यापुर्वीच्या पोलिस ,महसुल व आर. टी. ओ. प्रशासनातील अनेक धोरणी अधिकाऱ्यांनीही कधी कारवाई तर कधी वाळुचोरीस मुभा असा दुहेरी कारवाईचा पवित्रा घेत अनेक वाळू माफियांबरोबर स्वतःचाही प्रपंच भक्कम केला. त्यामुळे सीना नदी काठावरील अनेक गावात वाळू मधून रातोरात मिळणाऱ्या वारेमाप पैशामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढून सदर शांत असणारी गावे अशांत बनू लागली आहेत. त्यामुळे अनेक गावांमधील भांडण-तंटे वाढून स्टेशन डायरी रंगून पोलिस कर्मचाऱ्यांचे देखील उखळ पांढरे होऊ लागले. मात्र अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वाईट वेळ सीना काठा वरील गावावर आली आहे. त्यामुळे अनेक गावातील शांतता नाही झालीस मात्र वाळू उपसा केल्याने नदीत आता एक थेंबही पाणी थांबणे मुश्कील होऊन बसले आहे.
यापूर्वी सोलापूरचे शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, पोलिस निरिक्षक अशोक सायकर यांनी अनेक वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे एकेकाळी मोकळे असणारे तहसिलदार कार्यालय वाळु वाहणाऱ्या जप्त टेम्पो व ट्रॅक्टर ट्रेलरनी भरून गेले. अनेक ट्रॅक्टरवर कारवाई करून ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र गेल्या महिनाभरापासून मोहोळ महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन विविध निवडणुकीत गुंतल्यामुळे अनेक वाळूमाफियांनी आपापले ट्रॅक्टर यारी व बैलगाड्या नदीत उतरवुन राजरोसपणे रात्रंदिवस वाळूचा उपसा केला व विक्री केली. त्यामुळे नेतेमंडळीच्या गावातील निर्ढावलेल्या गुंडगिरी वृत्तीच्या वाळूमाफियांना सीना नदी म्हणजे जणू बापजाद्यांची प्रॉपर्टीच वाटु लागली आहे. त्यामुळे आता पुनश्च पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोहोळ तालुक्यातील वाळू चोरीचा व वाढत्या संघटीत गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे.
सीना नदी काठावरील अनेक शेतकरी बांधवांनी वाळू चोरांकडून ठराविक रक्कम घेऊन त्यांना रस्ता उपलब्ध करून दिला. त्यामुळे वाळू चोरीला अधिक पाठबळ मिळाले. त्यामुळे वाळू चोरांना वाट उपलब्ध करून देणाऱ्या शेतीमालकांवर बोजा तर चढवला गेलाच पाहिजे मात्र त्यांच्यावर वाळूचोरांना सहकार्य केल्याबद्दल गुन्हे देखील दाखल करण्याची आवश्यकता आहे. तरच वाळूच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यात मोठी मदत होणार आहे. सीना नदी असो किंवा भोगावती नदी या नदी काठावरील गावांमधील अनेक मंडल अधिकारी, तलाठी, बीट पोलीस अंमलदार कोतवाल हे सर्वच कर्मचारी घटक या वाळूचोरी मुळे चांगलेच फायद्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांच्या हद्दीत वाळूचोरी होते त्यांच्यावर सदर चोरांना सहकार्य केल्याबद्दलचा व आपल्यावरही कारवाई का केली जावु नये याबाबतचा खुलासा वरिष्ठ प्रशासनाने मागणे आता गरजेचे आहे.
0 Comments