शेतीव्यवस्थापनात बदलाची गरज - डॉ. जयवंत जाधव
मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात जागतिक हवामान दिन साजरा
सौंदणे (कटूसत्य वृत्त) :- ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात आमुलाग्र बदल होत असुन याचा मानवी जीवन, शेती उद्योग व जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. आजही शेतकरी पारंपारिक हंगामानुसार शेतीव्यवस्थापन करत असून हवामान बदलामुळे कोणतेच पीक व्यवस्थित हाती लागत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेतीव्यवस्थापनात बदल करण्याची गरज असल्याचे मत पूणे कृषी महाविद्यालयाचे कृषी हवामान शास्त्र विभागाचे विभागप्रमूख डॉ.जयवंत जाधव यांनी व्यक्त केले.
जागतिक हवामान दिनानिमित्त मोहोळ कृषी विज्ञान केंद्र व शेकरु फाउंडेशनने आयोजित केलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन शिबिरात जागतिक हवामान बदल आणि उपाययोजना या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि हवामानातील चढ-उतारामुळे अवकाळी पाऊस, चक्रीवादळे, गारपीट, ढगफुटी, पूर परिस्थिती, दुष्काळ अशा चक्रात शेतकरी सापडला असून शेती पिकवणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नव्या पद्धतीने शेतीव्यवस्थापन करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.
यावेळी नंदुरबार शासकिय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सत्ताप खरबडे यांनी पिकावरील रोग व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.तर कृषी हवामान तज्ञ डॉ.सुरज मिसाळ यांनी हवामान खात्याकडून विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जो हवामानाचा अंदाज पोहोचवला जातो त्यानुसार शेतीव्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.तानाजी वळकुंडे, प्रा. दिनेश क्षीरसागर, सुयोग ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन डॉ.शरद जाधव यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.पंकज मडावी यांनी केले.
0 Comments