पेनुर ग्रामपंचायत पे निगाहे लेकीन जिल्हा परिषद पे निशाना
पेनुर गटात जिल्हा परिषद निवडणुकीचे वारेग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र आलेले युवानेते जिल्हा परिषदेला एकत्र येणार का ?
मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ तालुक्याच्या राजकारणात काही गाव राजकीयदृष्ट्या इतकी समृद्ध आहेत की त्या गावातील अंतर्गत राजकारणावर तालुक्याच्या बऱ्याच राजकीय घडामोडी अवलंबून असतात. आशा गावांपैकी एक गाव म्हणजे पेनुर होय. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक राष्ट्रवादी पासून चार हात दूर असलेले ज्येष्ठ नेते मानाजी माने आणि आजवर ज्यांच्या ताब्यात सातत्याने ग्रामपंचायतीची सत्ता राहिली अशा सर्जेराव दाजी चवरे या दोन दिग्गज नेत्यांच्या पॅनलचा पराभव करण्यासाठी गावातील गट-तट विसरून इतर सर्वपक्षीय युवक एकत्र आले. एकत्र येण्याचा हेतू जरी विकासाचा असला तरी खऱ्या अर्थाने राजकीय हेतू होता मानाजी माने यांच्या राजकीय शक्तीचे खच्चीकरण करणे. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पेनुर मध्ये एकीकरणाचे वारे कृत्रिमरीत्या वाहिले गेले. एकेकाळी एकमेकांचे तोंडही न बघणारे गट एकत्र आले. हे एकत्रीकरण गावातील अनेक जणांना रुचले देखील नाही. हे पक्षीय एकिकरण विकासासाठी होते की गावाच्या राजकारणात मानाजी माने, सर्जेराव चवरे आणि आणि ज्येष्ठ नेते पोपट देशमुख यांच्या गटाचा पराभूत करण्यासाठी होते. हे निवडणुकीनंतरच्या निकाला नंतर सर्वांच्या ध्यानात आले. सुरुवातीला समन्वय असणाऱ्या या नव्या पॅनलमध्ये सरपंच कोण होणार हे जरी ठरले नसले तरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी माजी आ. राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक कथा युवा उद्योजक रामदास चवरे यांचे नाव चर्चेत होते. गत दीड वर्षापूर्वी मोहोळ तालुक्याच्या शिवसेनेत झंझावात निर्माण केलेले युवा नेते तथा शिवसेना माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे यांच्या देखील समावेशाची चर्चा चांगलीच रंगली. वास्तविक पाहता चरणराज चवरे आणि रामदास चवरे हे खऱ्या अर्थाने मानाजी माने यांचे चिरंजीव विक्रांत माने, आणि त्यांचे पुतणे दिग्विजय माने यांचे राजकीय स्पर्धक मानले जात असत. या निवडणुकीत जर दिग्विजय माने यांचा विजय झाला तर येत्या काळात होणाऱ्या विविध निवडणुकीमध्ये माने परिवाराचा प्रभाव संपूर्ण जिल्हा परिषद गटात निर्माण होऊ शकतो याची पुरेपूर पूर्वदक्षता घेत राष्ट्रवादी काँग्रेसने या गावात एकीकरण कसे होईल ? यासाठी मोठी मेहनत घेतल्याची चर्चा आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, मारुती गवळी गुरुजी, माजी पंचायत समिती सदस्य हरि चवरे, उद्योगपती भारत चवरे यांचे मोठे योगदान ठरले. राष्ट्रवादीने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे तालुका सरचिटणीस रमेश माने, त्याचबरोबर एकेकाळी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे समर्थक असलेले युवा उद्योजक आणि सध्याचे नूतन राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे यांचीही पुरेपूर साथ या नव्या पॅनलला मिळाली. तरीही या निवडणुकीत जोरदार राजकीय सामना होत मानाजी माने आणि सर्जेराव चवरे यांच्या गटाला आठ तर रामदास चौधरी रमेश माने चरणराज चवरे यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या. बाळराजे पाटील यांचे कट्टर समर्थक रामदास चवरे हे सरपंच पदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीत चमत्कारिक घडामोडी घडत नव्या पॅनलचा एक सदस्य फुटून मानाजी माने यांच्या गटाला मिळाला तर मानाजी माने यांच्या पॅनल मधून निवडून आलेल्या उमेदवाराने रामदास चवरे आणि चरणराज चवरे, रमेश माने यांच्या आघाडीत प्रवेश करत सरपंचपद स्वीकारले. सरपंच पदाच्या निवडणुकीत काही घडामोडी घडल्या असल्या तरी खऱ्या घडामोडी आता येत्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी घडणार आहेत. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या चमत्कारिक राजकीय घडामोडीकडे संपूर्ण मोहोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सध्या अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पेनुर जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडती वर पेनुर जिल्हा परिषद गटाचे पुढील राजकारण अवलंबून असणार आहे. युवा उद्योजक तथा राजन पाटील यांचे समर्थक रामदास चवरे आणि तांबोळेचे नूतन उपसरपंच तथा गेल्या अनेक वर्षापासून पाटील परिवाराशी एकनिष्ठ असलेले युवा नेते विजयराज कोकाटे या दोघांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. विजयराज कोकाटे हे राष्ट्रवादी युवकच्या तालुक्याच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन मुलाखत देखील दिली. मात्र विद्यमान तालुकाध्यक्ष राहुल मोरे यांना मुदतवाढ मिळाल्याने ऐनवेळी कोकाटे यांना संधी मिळाली नाही. पेनुर मधील युवा नेते तथा बाळराजे यांचे समर्थक सचिन चवरे हे देखील तालुका अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सोबत असलेल्या सागर चवरे यांना जिल्हा युवक उपाध्यक्षपदी संधी दिली गेली. या दोन्ही निवडीबद्दल तालुकाभर मोठी चर्चा देखील झाली. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत पेनुर जि प गटातील विजयराज कोकाटे आणि सचिन चवरे हे दोघे देखील पक्षाकडे उमेदवारीचा हक्क सांगू शकतात.तर शिवसेनेकडून चरणराज चवरे हे उमेदवार होऊ शकतात. पेनुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पडदयाआड झालेले राजकीय एकीकरण आता जिल्हा परिषद निवडणुकीत होणार का ? आणि जर झाले तर ते राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य होणार का ? याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ज्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत मानाजी माननीय यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मोठी राजकीय व्यूहरचना केली. तशी राजकीय व्यूहरचना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत होणार का आणि जर झाली तर त्या प्रस्तावाला पेनुर मधील शिवसेना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी कसे सहकार्य करणार ? राज्यात जरी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी पेनुर मध्ये काहीअंशी ग्रामपंचायत निवडणुकीला तो झाला. आता जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि भीमा लोकशक्ती परिवार अशा विविध पक्ष घटकांचा सामना एकमेकाशी होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर भिमाच्या राजकारणाची गणिते अवलंबून असतात तर भिमाच्या निवडणुकीवर मोहोळ तालुक्याचा विविध निवडणुकीची गणिते अवलंबून असतात. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या सर्व राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू पेनुर झाल्यास नवल वाटायला नको.
0 Comments