पक्षचिन्ह ठरतेय तिसऱ्या आघाडीची सर्वात मोठी अडचणअनेक सर्वपक्षीय पदाधिकारी लागले पडद्याआड कामाला

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये जरी उमेदवारी वाटपाची लगीनघाई सुरू असली तरी इतर पक्षांमध्ये म्हणाव्या तशा हालचाली दिसून येत नव्हत्या. मात्र भाजप आणि काँग्रेसने या आठवड्यात आपापल्या पक्ष स्तरावरील बैठका मोहोळमध्ये घेऊन निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी करून कमळ चिन्ह वरच निवडणुका लढवणे बाबतचे संकेत दिले आहेत तर काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी असो शिवसेना किंवा काँग्रेस अथवा भाजप या मधील बहुतांश नाराज असलेले आजी-माजी पदाधिकारी स्वतंत्र आघाडीची निर्मिती करण्याच्या तयारीला लागले आहेत मोहोळ शहराच्या पूर्व भागात दुसरी देखील बैठक पार पडल्याचे समजते. जर या सर्वपक्षीय स्वतंत्र विचारसरणीच्या ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांची सर्वपक्षीय आघाडी झाली तर त्याला पक्ष चिन्ह काय घ्यायचे ? हा देखील महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण जर या आघाडीला एखाद्या पक्षाचे चिन्ह दिले तर इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना त्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करणे म्हणजे पक्षद्रोह ठरू शकते. त्यामुळे ज्या नेत्यांच्या पक्षीय त्रासाला वैतागून आघाडीची निर्मिती केली आहे त्या पक्षाच्या मुख्य नेत्याला आयतेच अमुक नेता अन उपनेता तमुक पक्षाच्या प्रचाराच्या चिन्हासाठी फिरला म्हणून त्याच्यावर कारवाई करावी असा सूर निवडणुकीनंतर निघू शकतो. त्यामुळे एक पूर्व दक्षतेचा भाग म्हणून शक्यतो कोणत्याही पक्षाचे चिन्ह न घेता तटस्थ चिन्ह घेण्याचा या सर्वपक्षीय आघाडीचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. याबाबतची बोलणी गेले दोन आठवडे झाले सुरू असून निर्णय काही केल्या अंतिम टप्प्यात येईना झाला आहे.
मोहोळ शहराचे राजकारण असो अथवा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या ताकतीचा विरोधक नेता जरी नसला तरी मोठ्या क्षमतेने विरोध मात्र नेहमी होतो. विरोधकांची संघटित शक्ती एकत्र येताना राष्ट्रवादी असो अथवा शिवसेना यांच्यातील काही चाणाक्ष प्यादे यामध्ये हेतुपूर्वक घुसवले जातात. नंतर हेच मोटिवेट होऊन संघटितपणा मध्ये दुही निर्माण करतात आणि याचा वेळोवेळी फायदा राष्ट्रवादीला होतो. गत नगर परिषद निवडणुकीच्या वेळी देखील शिवसेना आणि भाजपची युती काही केल्या होऊ द्यायची नाही यासाठी राष्ट्रवादीने पडद्याआड मोठी मेहनत घेतली. नेमका याच मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीला तर काही प्रमाणात झालाच मात्र इतरही काही पक्षांना आपापल्या क्षमतेनुसार झाला. जर गत नगरपरिषद निवडणुकीला सर्वात मोठे नुकसान कोणत्या पक्षाचे झाली असेल तर ते म्हणजे शिवसेनेचे. आता या वेळी देखील जर दोन्ही पक्षांमधील नाराज उपनेते तिसऱ्या आघाडीत समाविष्ट झाले तर या मतविभागणीची उणीव कोणत्या नव्या मताद्वारे भरून काढायची याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बडया नेत्यांसमोर असणार आहे.
शिवसेनेमध्ये गतवेळी कोणत्याही प्रकाराचा एकोपा न होता या असमन्वयाचा फटका नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेला सर्वांनाच स्पष्टपणे बसला. गत विधानसभेच्या वेळी केवळ सात ते आठ हजार मताने विजय झालेली राष्ट्रवादी या वेळी तब्बल वीस हजारांपेक्षा जास्त मताने विजयी होऊ शकली ती भाजप आणि शिवसेनेमध्ये नसलेल्या व समन्वयामुळेच. लोकसभेला भाजपचा उमेदवार असला की शिवसेनेने अंग राखून काम करायचे आणि विधानसभेला शिवसेनेचा उमेदवार असला की भाजपने घरात बसूनच प्रचार करायचा. या दोन्ही बाबी आजवर घडत आल्यामुळे दोन्ही पक्ष मोहोळ तालुक्याच्या राजकारणात निष्प्रभ ठरत आले आहेत. राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांवर मात करण्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते जे काही घडतं ते एकमेकांच्या हेव्यादाव्यातच.
निगेटिव्ह मोडचा सर्वात मोठा फायदा हा तिसर्या आघाडीला होऊ शकतो. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठेकेदारीला आणि घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेले सर्वसामान्य नागरिकांना तिसरी आघाडी हा चांगला पर्याय होऊ शकतो. मात्र तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व द्यायचे कोणाला आणि सर्वमान्य नेतृत्वावर जरी लढले तर विजयानंतर निवडून आलेले नगरसेवक ताब्यात कसे ठेवायचे ? हा देखील मोठा जटिल प्रश्न आहे. कारण गेल्या पंधरा वर्षाच्या मोहोळ शहराच्या राजकारणात कधी शिवसेनेने राष्ट्रवादीचे सदस्य पळवले तर कधी राष्ट्रवादीने मोहोळ शहरातील अपक्ष दोन तर शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी एक सदस्य पक्षात घेतले. बेरजेच्या राजकारणात पक्षनिष्ठेची वजाबाकी होताना सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे पक्षाला सोडून तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याची मोठी रिस्क कधीकधी कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे एकसंघपणा आणि विश्वासार्हता या दोन्ही बाबी तिसऱ्या आघाडीला साध्य कराव्याच लागणार आहेत.
0 Comments