Hot Posts

6/recent/ticker-posts

पोखरापुर येथील जिल्हा परिषद शाळेवर मध्यरात्रीच ठेकेदाराने फिरवला बुलडोझर- ग्रामस्थांमध्ये संताप

 पोखरापुर येथील जिल्हा परिषद शाळेवर मध्यरात्रीच  ठेकेदाराने फिरवला बुलडोझर-  ग्रामस्थांमध्ये संताप

                                        

पोखरापूर (कटूसत्य वृत्त) :-  मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गाचे पोखरापुर येथे काम सुरू असून संपादित जागेतील पोखरापूर जिल्हा परिषद शाळेची इमारत, वॉल कंपौंड  ग्रामपंचायत किंवा शाळा व्यवस्थापनास कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री १.३० वा.च्या सुमारास  ठेकेदाराने बुलडोझर फिरवून शाळेचे वॉल कंपौंड जमीनदोस्त केले आहे.या घटनेमुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावातील ज्ञानमंदिरावर बुलडोझर फिरवल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच, मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
  सध्या मोहोळ-पंढरपूर पालखीमार्ग क्रं- ९६५ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोखरापुर येथील संपादित क्षेत्रातील धारकांमध्ये मोबदला मिळण्यासाठी  वाद असलेल्या क्षेत्रातचा मोबदला एकतर्फी निर्णय घेऊन कोर्टात रक्कम पाठवुन एकतर्फी जमीन संपादित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे काही शेतक-यांना कोर्टात हेलपाटे मारण्याची शिक्षा मिळत आहे. पोखरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची इमारत संपादित क्षेत्रात येत आहे. रात्रीच्या वेळी बुलडोझर फिरवून रस्ता करण्याअगोदर  पोखरापुर ग्रामपंचायत अगर शाळा व्यवस्थापनास तशी पूर्वसूचना देणे आवश्यक होते, तसेच त्याअगोदर शाळेची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत थांबणे आवश्यक होते. परंतु , राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी व ठेकेदार यांनी वेळेत काम पूर्ण करून वरिष्ठांकडून शाबासकी मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस बळाचा वारंवार गैरवापर करून संबंधित शेतकऱ्यांनाव धारकांना वेठीस धरून मनमानीपणे कामकाज करत आहेत, असा उपस्थित ग्रामस्थांनी आरोप केला आहे.
रात्री बुलडोझरने शाळा पाडण्याचा आवाज आल्यानंतर, जागरूक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. शाळा इमारतीची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर ठेकेदाराचे काम सुरू करू देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पाडलेल्या वॉल कंपौंडच्या ठिकाणी तातडीने पत्र्याचे कंपौंड करावे असे संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधींना मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी  बजावले. शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये,  अशा सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या चर्चेवेळी पोखरापूरच्या सरपंच नंदाताई लेंगरे, उपसरपंच आशिष आगलावे, हर्षद दळवे, संदीप दळवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल कदम, राजकुमार दळवे, अंकुश दळवे आदि उपस्थित होते.
या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच आज मंगळवार रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, मोहोळ पोलीस निरीक्षक अशोक सायकर, मोहोळचे गटविकास अधिकारी गणेश मोरे, महामार्गाचे अधिकारी विरपत आदींनी पोखरापूर येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी शाळेचे वांँल कंपौड, विद्यार्थी बसण्याचे डेक्स, खेळांचे लोखंडी साहित्य आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.शाळेची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत येथे रस्त्याचे काम सुरू करू नये असे यापूर्वीच लेखी कळविले असताना असे कृत्य करणे योग्य नाही असे शिक्षणाधिकारी राठोड यांनी सांगितले. रात्री बुलडोझर फिरवून झालेली नुकसान भरपाई ठेकेदाराने तातडीने द्यावी, शाळा इमारतीस तात्पुरते पत्र्याचे कंपौड मारुन  द्यावे असे ठेकेदार प्रतिनिधी व महामार्गाचे अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.यावेळी सरपंच सौ.नंदाताई लेंगरे, उपसरपंच आशिष आगलावे,संदीप दळवे, राजकुमार दळवे, दादा दळवे, राजाभाऊ उन्हाळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल कदम , हर्षद दळवे, केंद्रप्रमुख महादेव इटेकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.





Reactions

Post a Comment

0 Comments