विकासाचे रोल मॉडेल म्हणून तालुक्यात डिकसळ गाव पुढे येईल : यशराजे साळुंखे पाटील
सांगोला (कटुसत्य वृत्त ) :- डिकसळ गावचे सरपंच चंद्रकांत कारंडे यांची काम करण्याची पद्धत आणि ग्रामस्थांकडून त्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता आगामी काळात डिकसळ हे गाव तालुक्याच्या नकाशावर विकासाचे रोल मॉडेल म्हणून पुढे येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यशराज साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. सोमवार दि. 15 रोजी डिकसळ ता. सांगोला येथे लोकवर्गणीतून साकार होत असलेल्या क्रीडांगणाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य तथा कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अनिल मोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, डिकसळ गावचे सरपंच चंद्रकांत कारंडे यांच्यासह नुतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलतांना यशराजे म्हणाले डिकसळ हे गाव जिल्ह्याच्या सीमेवर असले तरीही विकासाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक उपक्रमात कायम अग्रेसर असणारे गाव आहे. गावातील 50 वर्षांची सत्ता उलथवून लावत ग्रामस्थांनी यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येथील ग्रामपंचायतीची सत्ता दिली आहे. येथील जनतेने ज्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हातात सत्ता दिली आहे तो विश्वास सार्थ ठेवत गावातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. दिपक साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध राहू. सातत्याने सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडत असणारे चंद्रकांत कारंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. या पदाला ते निश्चितच न्याय देतील आणि गावातील नागरिकांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील. वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या विकासाच्या अनेक योजना गतीमान करून गावाचा रखडलेला विकास ते पूर्ण करतील व सांगोला तालुक्याच्या नकाशावर डिकसळ या गावाला नवीन ओळख मिळवून देतील. असा आशावाद ही शेवटी यशराजे साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment