उद्योजक चंद्रकांत वाघमोडे यांनी केली प्रभाग 8 मधून उमेदवारीची मागणीप्रभाग खुला झाल्याने वाघमोडे यांनी उमेदवारीसाठी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट

मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेचे विकास मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ. राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक आणि मोहोळ शहरातील प्रथितयश उद्योजक चंद्रकांत वाघमोडे यांनी यावेळी देखील मोहोळ नगरपरिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांत वाघमोडे वास्तव्यास असलेला प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण खुला झाल्याने त्यांना या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांनी राजकीय मार्गदर्शक असलेले माजी आ. राजन पाटील यांची अनगर येथे जाऊन भेट घेऊन निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राजन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारीची मागणी केली आहे. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाशभाऊ चवरे यांच्याकडे त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचा मागणी अर्ज दाखल केला आहे. गत नगर परिषद निवडणुकीत उद्योजक चंद्रकांत वाघमोडे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवली होती. यावेळी केवळ २६ मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात चंद्रकांत वाघमोडे यांनी तब्बल तीनशे दोन मते खेचून घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे उमेदवार अतुल गावडे यांना ३२८ मते मिळाली होती. चंद्रकांत वाघमोडे हे मोहोळ शहरातील राष्ट्रवादीचे सक्रिय समर्थक आहे. माजी आमदार राजन पाटील, ज्येष्ठ नेते शहाजहान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यातील अग्रेसर आहेत. प्रभाग क्रमांक आठ खुला झाल्याने या प्रभागातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींना बोलून दाखवली. राष्ट्रवादीने संधी दिल्यास या प्रभागातून निश्चितपणे निवडणूक लढविण्याचा मनोदय वाघमोडे यांनी कटूसत्य प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
चंद्रकांत वाघमोडे हे राजन पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे वाघमोडे यांना राजकीय क्षेत्राची आवड असली तरी ते सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचा शहराच्या पूर्व भागातील अनेक प्रभागात मोठा जनसंपर्क आहे. सध्या ते प्रभाग क्रमांक आठ मध्येच वास्तव्यास आहेत. प्रभागातील अडीअडचणी समस्यांचा वाघमोडे यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे नगरपरिषद स्तरावर प्रतिनिधित्व करून प्रभागाला सर्वांगीण विकासाचा मॉडेल बनवण्यासाठी निश्चितपणे चंद्रकांत वाघमोडे चांगले काम करू शकतात.
0 Comments