शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 8 कोटी विकास निधीची मागणी , आ. दिपकआबांच्या पाठपुराव्याला पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद..!
सांगोला (कटुसत्य वृत्त ) :- सांगोला शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासात नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेल्या राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष व मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीमधून सांगोला शहरातील विविध प्रलंबित विकास कामांसाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या विकास निधीची आग्रही मागणी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी विविध विभागांना विकास कामांसाठी विकास निधी वितरित केला जातो. पालकमंत्री हे या समितीचे प्रमुख असतात. नगरपालिकांचे क्षेत्रफळ आणि वर्ग यांचा विचार करून जिल्ह्यातील नगरपालिकांना त्यांच्या हद्दीतील विकास कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत विकास निधी वितरित केला जातो. तब्बल 68 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आणि 13 वाड्या-वस्त्या यांचा समावेश असणाऱ्या सांगोला नगरपालिकेस गेल्या काही वर्षांपासून विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे शहरातील असंख्य विकास कामे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिली आहेत. ही बाब लक्षात घेऊन मा.आम. दिपकआबांनी शुक्रवार दि.5 मार्च रोजी मुंबई येथे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची समक्ष भेट घेऊन शहराच्या विविध प्रलंबित विकास कामांना 2020-21 या आर्थिक वर्षात मंजुरी देण्याबाबत लेखी मागणी केली आहे. यावेळी पालकमंत्री ना भरणेमामा यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीमधून सदरची प्रस्तावित कामे तात्काळ मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून 27, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून 33, तर नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेतून 6 अशा विविध योजनांतून तब्बल 66 विकास कामांना मंजुरी देण्याची मा.आम.दिपकआबांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यामध्ये शहरात विविध ठिकाणी नवीन रस्ते, गटार बांधणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे आणि अन्य विकास कामांचा समावेश आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे रस्ते व गटार यांसारखी अनेक कामे पूर्ण होणार असल्याने शहरवासीयांची वर्षानुवर्षे होत असलेली गैरसोय यामुळे लवकरात लवकर दूर होणार आहे. सांगोला शहरातील प्रलंबित विकासकामांची गरज लक्षात घेता याबाबत अजिबात दिरंगाई न करता सदर प्रस्तावित विकासकामांना लवकरात लवकर मंजुरी देऊन प्रत्यक्ष विकासकामांना चालू महिन्यातच सुरुवात होईल असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे राजकीय संबंध फार जिव्हाळ्याचे आणि मित्रत्वाचे असल्याने सांगोला शहर व संपूर्ण तालुक्याच्या विविध विकास कामासाठी याचा निश्चितच चांगला फायदा होत आहे. यापुढील काळातही सांगोला शहर व तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी कामे मा.आम. दिपकआबांच्या माध्यमातून तात्काळ मार्गी लावू असे पालकमंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केले.
0 Comments