युवा सामाजिक कार्यकर्ते जिब्राईल शेख हे प्रभाग 12 मधून राष्ट्रवादीकडूनचे संभाव्य उमेदवार
पक्षाकडे केली रीतसर उमेदवारीची मागणी

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- प्रभाग क्रमांक 12 या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता जिब्राईल शेख यांचे नाव पुढे येत आहे. प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 13 या दोन्ही प्रभागात शेख परिवाराचा दांडगा जनसंपर्क गेल्या अनेक वर्षापासून आहे. याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसामान्यांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान निर्माण केलेल्या शेख परिवारातील सदस्य असलेल्या जिब्राईल शेख यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण झाल्यामुळे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवावी याबाबत चर्चा सुरू होती. प्रभाग क्रमांक 12 हा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या प्रभागातून जिब्राईल शेख यांनी निवडणूक लढवावी अशी प्रभागातील राष्ट्रवादीच्या या प्रभागातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही बाब अनेक कार्यकर्त्यांनी प्रभागाचे विद्यमान नगरसेवक प्रमोद डोके यांना बोलून दाखवली. त्या नंतर प्रमोद डोके आणि जिब्राईल शेख यांनी पक्षनेते राजन पाटील यांची भेट घेऊन या प्रभागातून उमेदवारीची मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जिब्राईल शेख यांनी पक्षश्रेष्ठींची पूर्वपरवानगी घेऊन या प्रभागातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्याकडे रीतसर मागणी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते, उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक प्रमोद डोके, नगरसेवक संतोष वायचळ, सभापती नागेश साठे, राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष राजेश सुतार, श्रेयश पवार, अमीर मुलानी, मोहसीन शेख, निसार शेख, वसीम शेख, निसार शेख, जुबेर शेख, अक्रम शेख, नागेश बिराजदार इत्यादी सहा प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जिब्राईल शेख यांचे शहराच्या पुर्वेकडील प्रभागात आणि शहरातील अनेक समाजघटकांशी अत्यंत चांगले संबंध आहेत. शिवाय प्रशासनाचाही त्यांचा सातत्याने सामाजिक कार्यामुळे संपर्क येत असल्यामुळे अल्पावधीतच एक लोकप्रिय आणि राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून त्यांचे कार्य चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिब्राईल शेख यांची उमेदवारी जमेची बाब ठरू शकते. त्यामुळे जिब्राईल यांनाच उमेदवारी देण्यासाठी शहरातील चाणाक्ष पक्षश्रेष्ठींनी इतर कार्यकर्त्यांशी चर्चा आणि राजकीय चाचपणी सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रभाग क्रमांक 13 आणि 12 हे एकमेकाच्या लगतचे प्रभाव असल्यामुळे जिब्राईल शेख यांची बारा मधील उमेदवारी राष्ट्रवादीच्या 13 मधील उमेदवाराच्या विजयासाठी अत्यंत अनुकूल ठरणारा आहे. जिब्राईल शेख यांचा या दोन्ही प्रभागात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हे दोन्ही प्रभाग ताब्यात घेण्यासाठी जिब्राईल शेख यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
0 Comments